`अशा शिव्या देऊ की झोप लागणार नाही`, पडळकरांना बोलताना मुश्रीफांची जीभ घसरली
गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर केलेल्या आक्षेपार्ह टीकेनंतर अत्यंत हीन भाषेतल्या टीकांची मालिका सुरूच आहे.
कोल्हापूर : गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर केलेल्या आक्षेपार्ह टीकेनंतर अत्यंत हीन भाषेतल्या टीकांची मालिका सुरूच आहे. राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली आहे. हसन मुश्रीफ यांनी पडळकर यांच्या गोप्या असा एकेरी उल्लेख केला. तसंच आम्ही अशा शिव्या देऊ की झोपा लागणार नाहीत, असा इशाराही मुश्रीफ यांनी दिला.
फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे पडळकरांचे बोलवीते धनी आहेत, असा आरोपही मुश्रीफ यांनी केला. नथुराम गोडसेचं ज्या पद्धतीने उदात्तीकरण केलं जातं, त्याच पद्धतीने गोपीचंद पडळकर यांचं उदात्तीकरण केलं जातंय, अशी टीकाही मुश्रीफ यांनी केली. जर कायदा सुव्यवस्था बिघडली, तर याला विरोधी पक्षच जबाबदार असेल, असा इशाराही मुश्रीफ यांनी दिला आहे.
शरद पवार हे महाराष्ट्राला झालेले कोरोना आहेत, अशी आक्षेपार्ह टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. पडळकर यांच्या या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली. पडळकर यांच्या या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादीने ठिकठिकाणी आंदोलन केलं. तसंच पडळकरांनी माफी मागावी, अशी मागणीही राष्ट्रवादीने केली.
दुसरीकडे पडळकर यांचं हे वक्तव्य चुकीचं असल्याचं स्पष्टीकरण भाजपने दिलं. तसंच देवेंद्र फडणवीस यांनीही गोपीचंद पडळकर यांना याबाबत समज दिली.