मुंबई : देशात संघ विचार पसरवण्याठी आणि भाजपाचा एकछत्री अंमल आणण्यासाठी देशातील सरकारच्या पाठिंब्याने द्वेष आणि तिरस्कार जाणीवपूर्वक पसरवला जात असल्याची टीका कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलाय. तबलिकी समाजातील परदेशी लोकांवर कोरोनाचा फैलाव केल्याचा आरोप सरकारने केला होता. पण या आरोपाखाली दाखल झालेले गुन्हे रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. या पार्श्वभुमीवर सावंत बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपले अपयश झाकण्यासाठी सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांनी तबलिकी समाजाला बळीचा बकरा बनवला, अपप्रचार करण्यात आल्याचे सावंत म्हणाले. भाजपाचे केंद्रीय मंत्री आणि इतर नेते त्यांच्या नियंत्रणातील माध्यमे आणि समाज माध्यमांचा अत्यंत सुसूत्रपणे वापर करुन असत्याच्या आवाजाला कर्णकर्कश्य करत असतात, त्यामुळे असत्य हेच सत्य वाटते. अशावेळी सत्यासाठी लढणाऱ्यांची जबाबदारी वाढल्याचे ते म्हणाले. 



नाझी व मुसोलीनीच्या फॅसिस्ट विचारांची दिक्षा रा. स्व. संघाने संघ स्थापनेवेळीच घेतली आहे. हिटलरने ज्यूंना लक्ष्य करुन नाझी राष्ट्रवादाची रुजवण केली त्याच पद्धतीने देशात विशिष्ट समाजाला लक्ष्य केले जात असल्याचा आरोप सावंत यांनी केलाय. 


महाराष्ट्रातील पालघर साधुंच्या हत्येला कटाचे स्वरुप देणे किंवा सुशांतसिंगच्या आत्महत्येला राज्य सरकारला दोषी धरणे याकरता भाजपाने केलेले नियोजन हे चिंताजनक आहे. रातोरात हजारो फेसबुक पेजेस, युट्यूब चॅनेल्स, इन्स्टाग्राम, व्हाटसअपचे मेसेज तयार केले जातात आणि भाजपा नियंत्रीत माध्यमातून खोटी माहिती जाहीरपणे पसरवली जाते. जे मापदंड ही भाजपा नियंत्रित माध्यमे विरोधी पक्षांच्या सरकारांना लावतात ते भाजपाच्या सरकारांना लावत नसल्याचेही सावंत यांनी म्हटलंय.