राळेगणसिद्धी : उत्तर प्रदेशातल्या हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी निषेध केला आहे. या नराधमांना फाशी देण्यात आली पाहिजे, असे मत अण्णांनी व्यक्त केले आहे. असं दुष्कृत्य म्हणजे समाजाला लागलेला कलंक असून मानवतेची हत्या झाल्याची टीका त्यांनी केली. अशी दुष्कृत्य रोखण्यात देशाची सुरक्षा व्यवस्था कमी पडत असल्याची टीका त्यांनी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये काही नराधमांनी एका मुलीसोबत दुष्यकृत्य केले आहे. हा मानवतेवरील कलंक आहे. ही केवळ त्या मुलीची हत्या नाही तर मानवतेची हत्या आहे. भारत हा ऋषीमुनींचा देश म्हटला जातो. भारताची संस्कृती जगात श्रेष्ठ आहे. अशा देशात लाजेने मान खाली घालावी लागणारे दुष्कृत्य होणे हे योग्य नाही, अण्णा हजारे म्हणाले.


आणखी एक चिंताजनक गोष्ट म्हणजे ज्यांनी कायदा आणि सुव्यवस्था सांभाळायची, ते लोक यात कमी पडत आहेत. ही गोष्ट देशासाठी चिंताजनक आहे. असे प्रकार पुन्हा होऊ नयेत म्हणून अशा नराधमांना फाशी देणे आवश्यक आहे, असे हजारे यांनी म्हटले आहे.


... तर देशभर आंदोलन


दरम्यान, हाथरस येथील निर्भयाच्या मारेकऱ्यांना फाशी द्यावी, या मागणीसाठी जळगावात जिल्हाधिकाऱ्यांना राष्ट्रीय चर्मकार संघ आणि सर्वपक्षीय निवेदन देण्यात आले. फाशी दिली नाही तर देशभर आंदोलनाचा इशारा देण्यात आला. हाथरस प्रकरणाचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला.