वर्धा : मसाळा येथून एमआयडीसी सेवाग्राम येथे एका मालवाहू गाडीतून 400 लिटर डिझेल घेऊन येणाऱ्या वाहनावर हल्ला करून वाहनासह डिझेल पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालवाहू चालक सुनील सुखदेवराव पाटील (वय 60) हे गेल्या सहा वर्षांपासून प्रतिक दप्तरी यांच्याकडे चालक म्हणून काम करत आहेत. शनिवारी सकाळी सुनील पाटील यांनी आपल्या मालकाच्या घरातून निघाला. केळझर येथील शैलेंद्र दप्तरी यांच्या पेट्रोल पंपावर तो दुपारी पोहोचला.


केळझर येथील पेट्रोल पंपावरून सुनील याने 41 हजार 200 रुपये किमतीचे 400 लिटर डिझेल, 10 लिटर पेट्रोल ( 1220 रुपये ), जुनी बॅटरी ( 1500 रुपये ) असा माल घेऊन नवीन मसाळा हायवेने एमआयडीसी सेवाग्राम येथे निघाला. 


दरम्यान, सुनील यांची गाडी मसाळा हायवेवरून 500 मीटर समोर आल्यानंतर पाठीमागून येणारी एक पांढऱ्या रंगाची कार मालवाहू गाडीसमोर आडवी आली. त्यातून पटापट चार अनोळखी इसम उतरले. त्यातील एकाने सुनील यांना चाकूचा धाक दाखवून गाडीची चावी काढून घेतली.


चालक सुनील याला चाकूचा धाक दाखवत त्यापैकी एकाने मालवाहू गाडी पळवून नेली. ती काही अंतरावर गेल्यानंतर उरलेल्या तिघांनी आपल्या पांढऱ्या गाडीत बसून पलायन केले. 


या प्रकरणी सुनील पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी चार अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 400 लिटर डिझेल, 10 लिटर पेट्रोल, बैटरी आणि मालवाहू गाडी असा अंदाजे 2 लाख 95 हजारांचा मुद्देमाल घेऊन पसार झालेल्या चार अनोळखी इसमांचा पोलीस शोध घेत आहेत.