जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर : मंगळवारचा दिवस हा नागपूरकरांसाठी परीक्षा घेणारा ठरला. मंगळवारी नागपुरात या मोसमातील सर्वाधिक आणि गेल्या एक दशकातील दुसऱ्या क्रमांकाचे कमाल तापमान नोंदविण्यात आले. पुढील काही दिवस उष्णता अशीच कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर उष्माघातापासून बचावासाठी आरोग्य विभाग सज्ज असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या १० दिवसांपासून नागपुरातील तापमानात सातत्याने वाढ होत आहे. पारा हा सतत ४५ अंश सेल्सियस वर कायम आहे. अशात मंगळवारी पाऱ्याने ४७ अंश सेल्सियस ओलांडले. मंगळवारी नागपुरात ४७.५ अंश एवढ्या सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. नागपूरसह पूर्ण विदर्भातच उष्णतेची लाट असून चंद्रपुरात पार ४७.८ नोंदविण्यात आला.


अशा परिस्थितीत नागरिकांना उष्माघात होऊ शकतो त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. तसेच उष्माघात झाल्यास अगदी ग्रामीण रुग्णालयापासून जिल्हा रुग्णालयात उष्माघातावर उपचार करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागपूर विभागातील ६ जिल्ह्यांमध्ये २५२ प्राथमिक उपचार केंद्र, ५३ ग्रामीण रुग्णालय, १३ उपजिल्हा रुग्णालय व ५ जिल्हा रुग्णालय आहेत. या सर्व आरोग्य केंद्रात शीतगृह तयार केले असून औषधे उपलब्ध असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.


गेल्या ८ दिवसात नागपूर विभागात ११ उष्माघाताचे रुग्ण रुग्णालयात दाखल झाले होते ज्यांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली. तर १५ मार्च ते २७ मे पर्यंत उष्माघाताच्या एकूण १६३ रुग्णांवर उपचार करण्यात आले. यामध्ये भंडाऱ्याचे १८, गोंदियातले ४, चंद्रपूरचे २, गडचिरोलीचे ३, नागपूर ग्रामीणचे ७१ आणि नागपूर शहरातल्या ६५ रुग्णांचा समावेश आहे.