महाबळेश्वरला आले काश्मीरचे स्वरूप, जोरदार बर्फसृष्टी
महाबळेश्वर आणि पाचगणी परिसराला संध्याकाळी गारांच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले.
सातारा : महाबळेश्वर आणि पाचगणी परिसराला संध्याकाळी गारांच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले. (Heavy Heilstorm In Mahabaleshwar) पाऊस पडून गेल्यानंतर रस्त्यांवर बर्फाची चादर पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले रस्त्यावरून जाणारे पर्यटक या गाराच्या ठिकाणी मनमुराद आनंद घेताना दिसत होते. या झालेल्या गारांच्या मुसळधार पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा पसरला होता. रस्त्यावर आणि गवतावर पसरलेल्या गारांचा खच पाहून महाबळेश्वर नव्हे तर काश्मीर मध्येच असल्याचा भास होत होता.
महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये अचानक ढगांच्या गडगडाटासह गारांचा मुसळधार पाऊस झाला. गारा आणि पावसामुळे या परिसरातलं वातावरण पूर्णपणे बदलून गेले आहे. गारांचा पाऊस पडल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा बर्फाची चादर अंथरल्याचे पाहायला मिळाले.
पर्यटनासाठी महाबळेश्वरमध्ये आलेल्या पर्यटकांची मात्र यावेळी चांगलीच चंगळ झालेली पाहायला मिळाली. स्थानिकांसह पर्यटकांनी रस्त्यावर पडलेल्या बर्फावर स्केटिंगचा आनंद घेतला. महाबळेश्वर परिसरात दोन तास चांगला पाऊस झाला. काही ठिकाणी सखळ भागांमध्ये पाणी साचलेले होते. अचानक आलेल्या या पावसामुळे वेणा नदीच्या पातळीतही वाढ झालेली पाहायला मिळाली.
परंतु अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांसह पर्यटकांची तारांबळ पाहायला मिळाली. तसेच त्यांना एक वेगळाच अनुभव घेता आला. रस्त्यावर पडलेल्या गारा दूर सारत पर्यटक गाडीने पुढे जाताना दिसत होते. यावेळी बच्चे कंपनीने गारा एकमेकांवर मारत आनंद लुटला.