मुंबई : भारतीय हवामानशास्त्र विभागाने उत्तर बंगालच्या उपसागरात हवेच्या दाबाचे प्रमाण कमी झाल्यामुळे आता मान्सून काहीसे दक्षिणेकडे वळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 04 ऑगस्ट रोजी उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहारसह अनेक राज्यात अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगडमध्ये पुढील 2-3 दिवस पाऊस सुरूच राहण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरातमध्ये 5 ते 6 ऑगस्टला मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, येत्या 48 तासांत पूर्व राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.



हवामान खात्याने (आयएमडी) महाराष्ट्राची राजधानी मुंबईसह राज्यातील इतर भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आयएमडीच्या म्हणण्यानुसार मुंबई व राज्यातील इतर काही जिल्ह्यांमध्ये 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) म्हटले आहे की, 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान मुंबईशिवाय रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सांगली, बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.



हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, येत्या 24 तासांत कर्नाटक आणि दक्षिण कोकण-गोवा भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य प्रदेश, दक्षिण गुजरात, महाराष्ट्र, उत्तराखंड, मेघालय आणि लक्षद्वीप या ठिकाणी हलकी ते मध्यम सरी बरसण्याची शक्यता आहे. कर्नाटक, किनारपट्टी, आंध्र प्रदेश, उत्तर छत्तीसगड, उत्तर ओडिशा आणि गुजरातच्या काही भागांत हलक्या पावसाची शक्यता आहे. झारखंड, उत्तर प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा आणि पंजाब या भागांत जास्त पावसाची अपेक्षा नाही.