मुंबई : मुंबईसह उपनगरात उद्या अति मुसळधार पावसाचा हवामान विभागाने इशारा दिला आहे. सातारा, कोल्हापूर, पुण्यातही सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या 2 दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची दैना झाली. हळूहळू सकाळी सगळ्याच रेल्वे ठप्प झाल्या. मध्य रेल्वे 10 तासांपासून ठप्पा आहे. सायन स्थानकादरम्यान अजूनही बरंच पाणी साचलेलं आहे. सकाळी घराबाहेर पडलेले चाकरमानी अजूनही घरी पोहोचलेले नाही. सर्वच रेल्वे स्थानकावर प्रवाशी बसून आहेत. मुंबईकरांचे अक्षरश: हाल होत आहे. ढिम्म प्रशासनाचा कारभार पुन्हा एकदा समोर आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण असल्याने येत्या ८ सप्टेंबरपर्यंत राज्यातील बहुतांश भागात पाऊस सक्रिय राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या ४८ तासांत मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने इशारा दिला आहे. मुंबईकरांनी समुद्रकिनारी जाऊ नये असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.


मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्यानं दादर स्थानकामध्ये प्रवाशांचा खोळंबा झालाय. सीएसएमटी रेल्वे स्थानकावर मुंबईकरांच्या संतापाचा उद्रेक झाला. स्टेशन मास्टर कार्यालयाबाहेर प्रवाशांनी संताप व्य़क्त केला. लोकल सेवा कधी सुरु होईल याची माहिती दिली जात नसल्याने प्रवासी संतप्त झाले.


१०० मिमी पाऊस झाला आणि मुंबई पुन्हा विस्कळीत झाली. जगातली एक महानगरी मुंबई... पण १०० मिमी पावसाने मुंबईची अव्यवस्था पुन्हा जगासमोर आली. गेल्या २४ तासांत मुंबईत १०० मिमी पाऊस झाला आणि मुंबापुरीची तुंबापुरी झाली. मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस झाला आणि जनजीवन विस्कळीत झालं. मुंबईसह ठाणे, भिवंडी, कल्याण, नवी मुंबई, वसई, दादर आणि पालघर या भागाला पावसाने झोडपून काढलं. सतत सुरु असलेल्या पावसामुळे सखल भागांत पाणी साचलं. त्यामुळे रेल्वेसहित रस्त्यावरील वाहतूकही ठप्प झाली.


मुसळधार पावासामुळे ठाणे, मुंबई आणि कोकणातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. गणपती उत्सवात रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याचा इशारा ५ दिवसांपूर्वीच दिला होता. मात्र मनपा प्रशासन, रेल्वे प्रशासन, राज्य सरकार कोणत्याही स्वरूपात तयार असल्याचं दिसलं नाही.