कल्याण-डोंबिवलीला मुसळधार पावसाने झोडपले, वाहतूक मंदावली
आज अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे प्रवाशांना चांगलाच त्रास सहन करावा लागला आहे.
कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशन जवळ पावसाचे पाणी साचायला सुरुवात झाली आहे. रुळांवर पाणी साचल्याने रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोकल उशिराने धावत आहेत. त्यामुळे कल्याण रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. आज संध्याकाळपासूनच मुसळधार पावसाने मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरात हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. दिवा ते ठाणे दरम्यान काही ठिकाणी रेल्वे रुळावर पाणी आल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. याचा परिणाम कल्याण रेल्वे स्थानकावर देखील दिसून आला. लोकल सेवा विस्कळित झाल्याने घरी परतणाऱ्या प्रवशांचे चांगलेच हाल झाले.
कल्याण रेल्वे स्थानकावर घरी परतणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी आज पाहायला मिळाली. मुसळधार पावसामुळे कल्याण रेल्वे रुळावर पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर कल्याण रेल्वे स्थानकातील रुळ देखील पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसराला आज सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने झोडपून काढले असून काही ठीकणी रस्त्यावर तसेच सखल भागातील चाळींमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे.