रत्नागिरी : कोकणात पावसाचा हाहा:कार सुरू आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये आणि गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री अनिल परब यांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


चिपळूणमध्ये 2005 नंतर भीषण परिस्थिती 


वशिष्ठी, शिव नदीला पूर आला आहे. खेडमध्येही जगबुडी नदीला महापूर आला आहे. तब्बल पाच हजार लोकं पाण्यात अडकली आहेत. या लोकांना सुखरूप स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे. तर, अनेक गाड्या पाण्यात बुडाल्या आहेत. अतिशय भयावह स्थिती त्याठिकाणी उद्भवली आहे. चिपळूणमध्ये मदतकार्याला सुरुवात झालीय. घरांमध्ये अडकलल्या नागरिकांना बोटीनं बाहेर काढण्यात येतं आहे. 


पुरामुळे तिघांच्या मृत्यूची शक्यता


चिपळूण-पेढे गावात दोघे जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले. तर चिपळूण-वडनाका परिसरात एक व्यक्ती वाहून गेल्याची माहिती आहे.


कोविड केंद्रातील रुग्णांचा जीव धोक्यात


चिपळूण कोविड केंद्रातील 21 रुग्णांचा जीव धोक्यात आहे. चिपळूण पालिका आणि अपरांत रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने खेडेकर क्रीडा संकुल इथं कोविड सेंटर सुरू करण्यात आलं आहे. त्यात 21 रुग्ण आहेत. येथील ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला आहे त्यामुळे रुग्णांचे जीव धोक्यात आहे. सेंटरच्या बाहेर उभी असलेली रुग्णवाहिका वाहून गेली आहे. 


पूरस्थितीचा रेल्वे वाहतुकीला फटका


पूरस्थितीचा फटका रेल्वे वाहतुकीलाही बसलाय. चिपळूणमधल्या पुरामुळं कोकण रेल्वे वाहतूक ठप्प झालीय. कोकण रेल्वेच्या एकूण नऊ एक्स्प्रेस गाड्या विविध स्थानकांवर थांबवण्यात आल्यात. सकाळपासून या गाड्या स्थानकावरच उभ्या आहेत. त्यामुळं रेल्वेतून प्रवास करणाऱ्या पाच हजार प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. संध्याकाळी कोकण रेल्वेकडून या 5 हजार प्रवाशांना अन्नाची पाकीटं वाटण्यात आलीयत.  पाणी कधी ओसरणार आणि एक्सप्रेस रेल्वे स्थानकातून कधी निघणार याची प्रवासी वाट बघताहेत



सिंधुदुर्ग जिल्ह्यातही धुवांधार पाऊस


तळकोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाची धुवाधार बॅटींग सुरूय. त्यामुळं कणकवली वागदे भागात मुंबई गोवा महामार्गावर पाणीच पाणी झालं आहे. जवळपासच्या नदीला पूर आल्यानं मुंबई गोवा महामार्गावर नदीच्या पुराचं पाणी आलंय. त्यामुळं मुबंई आणि गोवा या दोन्ही दिशेनं जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई गोवा महामार्गावर सध्या 2 फूट पाणी आहे. त्यामुळं दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगला लागल्यात. कुणीही या पाण्यात गाडी चालवण्याचं धाडस करु नये असं आवाहन प्रशासनानं केलंय.


महाड शहराला पुराचा विळखा


रायगड जिल्ह्यात महाड शहराला पुराचा विळखा पडलाय. सावित्री आणि काळ या नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. महाडमधील बाजारपेठ, भोईघाट, सुकटगल्ली, दस्तुरीनाका भागात पुराचं अडीच ते तीन फूट पाणी शिरलंय. शहरात तीन ते साडेतीन फुटांवर पाणी गेलंय. दादली पुलावरून पाणी वाहू लागलंय. अनेक गावांचा महाडशी संपर्क तुटलाय. नगरपालिकेने धोक्याचा इशारा दिलाय. महाडच्या बिरवाडी नाते भागातही पाणी शिरलंय. 


कणकवलीमधली 10 गावांचा संपर्क तुटला


सिंधुदुर्गात कणकवलीमधल्या नाटळ मल्हारी नदीवरचा पूल कोसळला. त्यामुळे 10 गावांचा संपर्क तुटलाय. सुदैवानं त्यावेळी पुलावरुन कुठलंही वाहन जात नव्हतं. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. एक दगडी पिलर खचून हा पूल कोसळलाय. पूल कोसळल्याने नरडवे, नाटळ, दिगवळे, दारिसेसह सुमारे दहा गावांचा संपर्क तुटलाय. पंधरा दिवसांपूर्वी या पुलाच्या एका बाजूकडचा एक दगडी खांब ढासळला होता.