कोल्हापूर : राज्यात आज अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पहायला मिळतोय. कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर आहे. मुसळधार पावसाने गगनबावडा मार्गावर पुराचं पाणी आल्याने वाहतुकीसाठीचा रस्ता बंद करण्यात आला आहे. तर कासारी नदीच पाणी रस्तावर आल्याने गावाचा संपर्क तुटला. जिल्ह्यातील तब्बल 39 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ पाहायला मिळतेय. पाणी पातळीत वाढ झाल्याने अनेक मार्गावर नदीचं पाणी आलं आहे. जिल्ह्यातील कोल्हापूर गगनबावडा या मार्गावर मांडुकली इथं कुंभी नदीचं पाणी आल्याने कोल्हापुर-गगनबावडा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. 



राधानगरी दाजीपूर मार्गावर मुसळधार पावसामुळे मोठं झाड कोसळल्याची घटना घडली आहे. झाड पडल्याने मार्गावरची वाहतूक काही तास ठप्प झाली होती. शाहूवाडी तालुक्यातील निळवंडे धरणातून विसर्ग करण्यात येत असल्यामुळे कासारी नदीच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झालीये. त्यामुळे बर्कि गावाचा संपर्क तुटला आहे. 


कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात अतिवृष्टी सदृश्य पाऊस बरसत असल्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल 39 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी ही 34 फूट 6 इंच इतकी झाली आहे. हळू हळू पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे सुरू असल्यामुळे प्रशासन आत्ता अधिक सतर्क झालं आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट तर धोका पातळी ही 43 फूट इतकी आहे.