रत्नागिरी : रायगड जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस, पोलादपूर, महाड, माणगाव, नागोठणे, पाली भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. सुकेळी खिंडीत मातीचा भराव रस्त्यावर आला आहे. त्यामुळे सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे. पावसामुळे महामार्गावरील वाहतूक मंदावली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. मालवण आणि वेंगुर्ल्यात रात्री मुसळधार पावसानं शहराच्या सखल भागात पाणी शिरलं. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं मालमत्तेचं मोठं नुकसान झालं. मालवण घरांमध्ये गुडघाभर पाणी साचल होतं. त्यांच्या घरातील वीजेच्या यंत्रणांसह अनेक जीवनावश्यक वस्तुचं मोठे नुकसान झालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेंगुर्ले तालुक्यातील कोचेरे येथे मधुकर सखाराम केरकर कुटुंब पाण्यात अडकल होते. रात्री 4 वाजता त्याना बाहेर काढण्यात आलं.  पावसाचा जोर सकाळी ओसरला असला तरी पावसाने मोठे नुकसान झालं आहे. नैर्ऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सून गेल्या आठवडाभरापासून एकाच जागी स्थिर असून, अनुकूल वातावरणाअभावी त्याची पुढील वाटचाल रखडली होती. मात्र काल दुपारपासून रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय.  मान्सूनसाठी लागणारे पोषक वातावरण तयार झालं असून, मान्सून वेगाने उर्वरित महाराष्ट्र, आसाम, छत्तीसगड, ओडिशा,पश्‍चिम बंगाल, गुजरात, मध्य प्रदेशमध्ये डेरेदाखल होईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 


येत्या 48 तासांत कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. सध्या महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीदरम्यान समांतर कमी दाबाचे क्षेत्र असून, मध्य महाराष्ट्रात द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. याच स्थितीमुळे कोकण, गोवा, मुंबईत जोरदार पाऊस पडणार आहे. 20 ते 24 जून पासून दरम्यान कोकणात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे.