निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड : मनमाड शहराला वादळी पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. जोरदार विजांच्या कडकडाटसह वादळी वारा व गारांसह शुक्रवारी मनमाड शहरात पावसाने हजेरी लावली. शहरात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली आहेत. मुसळधार पावसाने घरांचे पत्रे, छप्पर उडवून अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. विजांचे खांब वाकल्याने, तारा तुटल्याने अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरवर झाड कोसळल्याने रेल्वे वाहतूकही काही वेळ ठप्प झाली होती. मुसळधार पावसामुळे घरावर झाड कोसळून दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इदगाह भागातील मनोरमा सदन शाळेच्या वर्गातील खोल्यांचे पत्रे उडून शेजारी झोपडपट्टी वसाहतीवर पडले. यात अनेक घरांचे मोठ्या प्रमाणांवर नुकसान झाले आहे. दत्त मंदिर परिसरात घरावर झाड कोसळल्याने घराचे पूर्ण नुकसान झाले असून दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. अनेक भागात घराच्या भिंती कोसळल्या. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.


सुमारे वीस मिनिटे सुरु असलेल्या या मुसळधार पावसामुळे जिवाची काहिली करणाऱ्या उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. मृगाच्या पावसाने सुरवात केल्याने खरीप हंगामासाठी आशादायी वातावरण निर्माण झाल्याने शेतकरी काहीसा सुखावला आहे.