नाशिकमध्ये पाऊस सुरूच, गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
दोन दिवसांपासून नाशिक शहर परिसरात सुरू असणाऱ्या पावसामुळे गोदावरीची पूर परिस्थिती कायम आहे.
नाशिक : दोन दिवसांपासून नाशिक शहर परिसरात सुरू असणाऱ्या पावसामुळे गोदावरीची पूर परिस्थिती कायम आहे. धरण क्षेत्रात पाऊस सुरु असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातोय. त्याच बरोबर शहराच्या इतर भागातून, छोट्या नाल्यातून गोदापत्रात पाणी येत असल्याने नदीच्या पाणी पातळीत वाढ झालीय.
सकाळी सहा वाजता गंगापूर धरणातून पुन्हा एकदा 5 हजार 109 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. रामकुंडाजवळील होळकर पुलापासून 9 हजार 469 क्युसेक वेगाने पाणी प्रवाहित होतेय. दारणा धरणातून 9 हजार 604, आळंदी मधून 3 हजार 571 तर नांदूर मध्यमेशवरमधून 49 हजार 478 क्युसेक्स पाणी जायकवाडीच्या दिशेने सोडण्यात आलंय. त्यामुळे गोदाकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.