मुसळधार पावसामुळे कृष्णा, वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ
कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीतील वाढ होत असल्याने पाटबंधारे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सांगली: धरणातून सोडलेले पाणी आणि पावसाचा जोर कायम असल्यामुळे कृष्णा, वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. २४ तासात ७० मिलीमीटर पावसाने अतिवृष्टीची नोंद झाली आहे. वारणा धरणातून सोडलेले पाणी आणि जोरदार पाऊस यामुळे, वारणा नदीला पूर आला आहे. त्यामुळे शिराळा तालुक्यातील आरळा-शित्तूर, कोकरुड-रेठरे, काखे- मांगले, मांगले-सावर्डे असे चार पूल पाण्याखाली गेले आहेत. नदीकाठची भात, ऊस आणि इतर पिके दुसर्यांदा पुराच्या पाण्यात बुडाली आहेत.
कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू
कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने, कृष्णा नदी दुथडी भरुन वाहत असून, अनेक ठिकाणी नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णेच्या पाण्याची पातळी 26 फुटांवर गेली असून, औदुंबर येथील दत्त मंदिरात पाणी शिरले आहे.
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीतील वाढ होत असल्याने पाटबंधारे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.