सांगलीत पुरात बोट उलडून ११ जण बुडाले, ९ जणांचे मृतदेह हाती
बचाव कार्य करणारी खासगी बोट बुडाली.
सांगली : जोरदार पावसामुळे कोल्हापूर आणि सांगली येथे मोठा पूर आला आहे. अनेक लोक पुरात अडकले आहेत. पुरातून लोकांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक लोकांसह प्रशासनाकडून मदत करण्यात येत आहे. दरम्यान, पलूस ताल्युक्यात बचाव कार्य करणारी खासगी बोट बुडाली. या दुर्घटनेत ९ जणांचे मृतदेह सापडले आहेत. ब्रह्मनाळ पासून खटावकडे जाताना बोट बुडली. बोटीत ३० जण होते. ११ जण बुडाल्याचे सांगण्यात येते आहे. सध्या ९ जणांचे मृतदेह सापडले आहेत. त्यात ४ महिला, एक लहान मुलगी, तीन पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.
सांगलीत महापुराची परिस्थिती कायम असून, आयुर्विन पूला जवळ कृष्णानदीची पाणीपातळी सकाळी ५६ फूट ८ इंच इतकी आहे. सांगलीतील अनेक उपनगरामध्ये अद्यापी पाणी शिरलेलं आहे. कालपासून सुरू असलेलं बचावकार्य आज देखील सुरू राहणार आहे. एनडीआरएफच्या आणखी दोन टीम आणि २ कोस्ट गार्डच्या टीम जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. लोकांच्या बचाव कार्यासाठी गरज भासल्यास जिल्ह्यासाठी हेलिकॉप्टरची मागणी करण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यात ७० हजार लोक आणि २१ हजार जनावर स्थलांतरित झाले आहेत. तर जिल्ह्यात २१ हजार पाचशे हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.