मुंबई : आज सकाळपासूनच मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. (Rain In Mumbai ) यामुळे तासाभरातच सायन गांधी मार्केटमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. दोन दिवसापूर्वीदेखील या ठिकाणी पाणी साचल्याने अनेक गाड्या अडकल्या होत्या. आज देखील तीच वेळ येऊ शकते. कालच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा सकाळीच पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच राज्यात कोकणसह विदर्भात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. (Monsoon Alert) 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मुंबईत दादर सायन परिसरात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. आज दिवसभर असाच पाऊस राहिल्यास आजही मुंबईची तुंबई होण्याची शक्यता आहे. परवा पडलेल्या पावसानंतर आलेल्या अनुभवातून मुंबईकरांनी आपली काळजी घ्यायची आहे. कारण पुढचे पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. 



 


कोकणसह विदर्भात अतिवृष्टीचा इशारा


पुढील पाच दिवस कोकणासह विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला. मान्सून दाखल झाल्यावर पहिल्याच दिवशी मुंबईला झोडपून काढल्यावर काल पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र काल रात्री आठनंतर पुन्हा एकदा अनेक ठिकाणी पावसाला सुरूवात झालीय. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस अत्यंत मुसळधार म्हणजेच 200 मिमीपेक्षा जास्त पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  




किनारपट्टीच्या भागात सोसाट्याचा वाराही वाहणार आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोेल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस, तर घाट क्षेत्रात काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज आहे.मराठवाड्यात परभणी, हिंगोली, नांदेड आदी जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. रायगडमध्ये 12 जूनला अत्यंत मुसळधार म्हणजेच 200 मिमीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे.


मान्सून आता राज्याच्या कानाकोप-यात पोहोचला आहे. गेल्या वर्षी 14 जूनला त्याने महाराष्ट्र व्यापला होता. कोकणातून तो मुंबई परिसरात दाखल होत असताना किनारपट्टीच्या भागात मोठ्या उंचीचे ढग निर्माण झाले होते. त्यामुळे अतिवृष्टीची नोंद झाली आहे.