मुंबईसह कोकणात पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता
Rain News : मुंबई उपनगरसह कोकणामध्ये पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई : Rain News : मुंबई उपनगरसह कोकणामध्ये पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पुढील चार ते पाच दिवसांमध्ये संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय राहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. (Heavy rains expected in Mumbai and Konkan in next 24 hours)
मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून मुंबई महापालिकेला अलर्ट, तर कोकणाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे परिसरासह कोकण विभागांत गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला असून, आणखी चार दिवस काही भागांत जोरदार पावसाच्या सरी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले तीन दिवस चांगला पाऊस कोसळत आहे. शेतीच्या कामांना वेग आला आहे. तर रायगड जिल्ह्यातही चांगला पाऊस पडत आहे. काल मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस झाला. आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली आहे.
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अधूनमधून पावसाची रिपरिप सुरु आहे. मात्र मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली नाही. पण जो काही पाऊस झालाय त्यामध्ये शेतकऱ्यांनी पेरण्याची कामं करायला सुरुवात केलीये. जून महिन्याच्या तोंडावर काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या, मात्र पावसाअभावी त्या रखडल्या होत्या.