पुणे :  मागच्या २ दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. असं असतानाच भारतीय हवामान खात्याने पुढच्या २४ तासांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, कोकण पट्टा, मध्य महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी अतिवृष्टी होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईमध्ये कालपासून सुरू असलेल्या पावसाने आज दिवसभरही झोडपले. कुलाब्यामध्ये आत्तापर्यंतच्या ऑगस्ट महिन्यातील विक्रमी पावसाची नोंद आज झाली आहे. आज आत्तापर्यंत कुलाब्याला २९३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी १० ऑगस्ट १९९८ ला २६१ मिमी पावसाची नोंद झाली होती, त्याचा विक्रम पावसानं आज मोडून काढलाय.


दुसरीकडे कोकणातही आज दिवसभर तुफान पाऊस झाला. रायगडमधल्या सावित्री आणि कुंडलिका नद्यांना पूर आला आहे. अनेक भागांमधून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. 


कोल्हापुरातही मुसळधार पाऊस सुरूच आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी ३७ फूट ९ इंचावर गेली आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट एवढी आहे, तर धोका पातळी ४३ फूट आहे. आज राात्री पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे वाटचाल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहून, सुरक्षित स्थलांतर करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.