प्रफुल्ल पवार / अलिबाग : रायगड जिल्ह्याला मुसळधार पाऊस झोडपून काढतोय. मुसळधार पाऊस कालपासून सुरुच आहे. आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर रायगड जिल्ह्यात पावसाने सोमवार रात्री्पासून हजेरी लावली मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असला तरी महाबळेश्वर आणि प्रतापगड या घाट माथ्यावर जोरदार पाऊस झाल्याने त्याचा परिणाम महाड तालुक्यातील सावित्री तसेच गांधारी या नद्यांवरती झाला आहे. आज सकाळी महाड शहरात पुराचे पाणी घुसले आहे. अनेकांची तारांबळ उडालेली दिसून येत आहे. असाच पावसाचा जोर राहिला तर मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मंगळवारी सकाळी सावित्री तसेच गांधारी या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने पुराचे पाणी महाड शहरातील सुकटगल्ली , मच्छीमार्केट, दस्तुरीनाका , भोईवाडा, क्रांतीस्तंभ या सखल भागात पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. यामुळे नगर पालिका प्रशासनाने शहरात सायरन वाजवून सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. रायगड जिल्ह्यात काल संध्याकाळ पासूनच जोरदार  पाऊस होत आहे.



आज सकाळपासून पावसाचा जोर कमी असला तरी महाबळेश्वर परिसरात जोरदार पाऊस होत आहे. परिणामी सावित्री नदी पात्रात झालेली वाढ पहाता पुराचा धोका निर्माण झाला आहे. सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे तर कुंडलिकेचे पाणी धोक्याच्या पातळीजवळ पोहोचले आहे. रायगड जिल्ह्याच्या अन्य भागात अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. तसेच वादळाचा जोरहीकायम दिसून येत आहे. समुद्र किनारी भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. समुद्र किनारी कोणीही जाऊ नये, असा अलर्टही प्रशासनाकडून जाही करण्यात आला आहे.