गडचिरोली : राज्यात काही ठिकाणी पावसाने उसंत घेतली आहे तर काही ठिकाणी अजूनही पाऊस सुरू आहे. गडचिरोली, बुलढाणा, चंद्रपूर जिल्ह्यात पावसानं थैमान घातलं आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली- भामरागड रस्ता पुन्हा बंद झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पर्लकोटा नदीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यानं नदीला पूर आला. त्यामुळे 130 गावांचा जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे. 24 तासांपूर्वीच या मार्गावरील वाहतूक सुरु झाली होती. मात्र मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली. त्यामुळे आलापल्ली-भामरागड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.


दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा या दोन्ही तालुक्याच्या मधे आमना नदीची सीमा आहे. पावसाळ्यामध्ये या नदीच्या पाणी पातळीत वाढ होताच गावक-यांची दैना होण्यास सुरूवात होते. नदी पार करण्यासाठी पुल नसल्यानं शाळकरी मुलं आणि गावक-यांना आपला जीव मुठीत घेऊन नदी पार करावी लागत आहे.


चंद्रपुरात नाला पार करताना अचानक आलेल्या पुराच्या लोंढ्यात एक बैलगाडी शेतक-यासह वाहून गेली. कोपरना तालुक्यातील नांदा गावात ही थरारक घटना घडली.. दुथडी भरुन वाहणा-या नांदा नाल्यात एका शेतक-यानं बैलगाडी घातली.


अचानक पाण्याचा लोंढा आल्यानं बैलांसह बैलगाडी वाहून गेली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत बैलजोडी आणि गाडीतील दोघांचा जीव वाचवला. पावसाळ्यात या नाल्याचं पाणी वाढतं त्यामुळे सात ते आठ गावांचा संपर्क तुटतो.


नाल्यावर पूल नसल्यानं ग्रामस्थांना गावात जण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागते.. गेल्या 15 वर्षांपासून ग्रामस्थ या नाल्यावर पूलाची मागणी करत आहेत. मात्र प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.