जळगाव : Heavy rains in Jalgaon : जिल्ह्यात धो धो पाऊस कोसळत आहे. धरण क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असल्याने हतनूर धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे हतनूर धरणाचे 30 दरवाजे 1 मीटरने उघडले आहेत. हतनूर धरणातून 39200 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ आणि मध्यप्रदेशमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जलसाठ्यात वाढ झाली आहे. 


गोसेखुर्द धरण क्षेत्रात पावसाची संततधार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे काल रात्री पासून गोसेखुर्द धरणाच्या 33 पैकी 5 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आलेत. यंदा पहिल्यांदाच धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेत. या 5 दरवाजातून 695.86 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरुय. त्यामुळे वैनगंगा नदी दुथडी भरुन वाहतेय. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


नदीत 10 शेतकरी अडकले


भंडाराच्या लाखांदूर तालुक्यातून वाहणाऱ्या चुलबंद नदीत 10 शेतकरी अडकले होते. त्या सर्व शेतकऱ्यांची सुटका करण्यात आली. हे शतकरी आवळी गावातील आहेत. नावेतून शेताकडं जाताना अचानक पूर आल्यानं सर्वजण नदीत अडकले. नावाडी नारायण कुंभरे यांनी शिताफीनं नावेला नदीपात्रातील एका मोठ्या दगडावर अडकवलं. आणि दुस-या नावेच्या मदतीनं शेतकऱ्यांना बाहेर काढलं. 


चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा जबरदस्त फटका बसला. मूल तालुक्यातील राजोली गावात लोकांच्या घरात पाणी शिरलं. ग्रामपंचायतीच्या चुकीच्या नियोजनामूळे घरात पावसाचे पाणी घुसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. ग्रामपंचायतीनं नाले आणि रस्त्याची उंची वाढवल्यामुळे, गावात पाऊस आणि नाल्याचं पाणी शिरल्याचा आरोप होतोय. 


पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील खजरी ते खोडशिवनी मार्गावरील पूल वाहून गेलाय. त्यामुळे 16 गावांची वाहतूक बंद झालीये. विद्यार्थ्यांसह सर्व नागरिकांना पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागत आहे.