मुंबई / रत्नागिरी : मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर कोकणातही अनेक ठिकाणी दोन दिवस पाऊस कोसळत आहे. चक्रीवादळाच्याआधी पाऊस सक्रीय झालेला दिसून येत आहे. कोकण, मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. तर कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. रत्नागिरीतील गुहागर, दापोली, मंडणगड आणि रत्नागिरीत हा मुसळधार पाऊस चांगला जोरदार पाऊस पडत. हा निसर्ग चक्रीवादळाचा परिमाण असून वाऱ्याचा वेगही वाढला आहे. ताशी ८० ते  १०० किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. या वाऱ्यांचा वेग दुपारनंतर वाढण्याची अधिक शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने  राज्याच्या किनारपट्टीला चक्रीवादळ धडकणार आहे. तसा इशारा भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. निसर्ग असं या चक्रीवादळाचं नाव आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीला हा धोका आहे. आपतत्कालीन स्थितीला सामोरं जाण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. तटरक्षक दल, एनडीआरएफची टीम सज्ज आहे.  


चक्रीवादळाच्या पार्श्वभूमिवर मुंबईमध्ये 'शोध आणि सुटका' या मोहिमेसाठी नौदलाच्या 5 टीम विविध ठिकाणी सज्ज ठेवल्या आहेत. मानखुर्द इथं आयएनएस तानाजी इथं एक टीम सज्ज आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमिवर एनडीआरएफच्या १५ टीम राज्यात तैनात आहेत. त्याची माहिती एनडीआरएफने दिली आहे. तर चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय तटरक्षक दल सज्ज असताना समुद्रात जवानांनी मच्छीमारांना सतर्क केले आहे.  


ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात निसर्ग वादळाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणेचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांच्यासह महापालिकांचे अधिकारी उपस्थित होते. वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता लक्षात घेऊन दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्यासाठी पथके तैनात ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत.