मुंबई : राज्यात अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. रायगडमध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. तर सर्वाधिक पाऊस हा पनवेलमध्ये झाला आहे. पुणे येथे पावसाने झोडपून काढले आहे. कोकणातही चांगला पाऊस पडत आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला असून समुद्र किनारी न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.  


अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रायगड जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरूय. महाड, माणगाव, तळा रोहा, पेण, अलिबाग, म्हसळा तालुक्यात पावसाची संततधार सुरुय. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पाली पुलावरून पाणी वहायला सुरुवात झालीय तर वाकण ते खोपोली वाहतूक बंद करण्यात आलीय. रायगड जिल्ह्यात पावसानं सरासरी ओलांडलीय. आतापर्यंत सरासरीच्या १२२ टक्के पाऊस पडलाय.


पुण्यात जोरदार, खडकवासला धरणातून विसर्ग सुरु


पुण्यात पावसाची संततधार सुरूच आहे. काल संध्याकाळपासून पावसाला सुरुवात झालीय. धरण क्षेत्रातही दमदार पाऊस पडत आहे. खडकवासला धरणातून २२ हजार ८८० क्युसेक वेगानं विसर्ग सुरु आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यात आले आहे.


मुंबईत पावसाचा जोर, समुद्र किनारी न जाण्याचा इशारा


तर पुणे कोलाड राष्ट्रीय महामार्गावर ताम्हिणी घाटाच्या जवळ निवे गावांमध्ये दरड कोसळल्यामुळे ताम्हिणी घाट बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे मुळशी तालुक्यातून कोकणात जाणारी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. कोकणात जाणाऱ्या वाहनांनी इतर पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन पोलिसांनी केले आहे.


कोयना धरणाचे दरवाजे ६ फुटांवर उचलले


सातारा-महाबळेश्वर आणि कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. कोयना धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. धरणाचे दरवाजे ६ फुटांवर घेऊन ५६ हजार ३७२ क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरूय. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.