मराठवाड्यात पावसाचा हाहाकार, 35 बळी; 20 लाख हेक्टरचे नुकसान तर 4000 जनावरे वाहून गेली!
Heavy rains in Marathwada : मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसाने आतापर्यंत 35 जणांचे बळी गेले आहेत. नद्यांना पूर आल्याने जवळपास 4 हजार जनावरं वाहून गेली आहेत.
बीड, औरंगाबाद, नांदेड, लातूर : Heavy rains in Marathwada : मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसाने आतापर्यंत 35 जणांचे बळी गेले आहेत. नद्यांना पूर आल्याने जवळपास 4 हजार जनावरं वाहून गेली आहेत. 20 लाख हेक्टरवर शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही मराठवाड्यात आतापर्यंत 20 लाख हेक्टरचे नुकसान झाले आहे, अशी माहिती दिली आहे. ज्यांचे नुकसाना झाले आहे, त्या सर्वांना मदतीच्या सूचना वडेट्टीवार यांनी दिल्या आहेत. ( Rains in Marathwada)
मराठवाड्यात अतिवृष्टी सुरु असून सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. विदर्भ आणि मराठवाड्याला सर्वाधिक फटका बसणार आहे. त्यामुळं लोकांनी दोन दिवस सावधानता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच आवश्यक असल्यास लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सर्व जिल्हाधिका-यांना नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मराठवाड्यात पावसामुळे दाणादाण उडाली आहे. उस्मानाबादमध्ये मांजरा, तेरणा या प्रमुख नद्यांसह नदी-नाले ओसंडून वाहतायत. पाणी अनेक गावांमध्ये शिरल्याने धोक्याची परिस्थिती निर्माण झालीय. बीडमधल्या केज, अंबेजोगाई, माजलगाव तालुक्यात पाऊस बरसला. त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे आता शेतासाठी घेतलेलं कर्ज कुठून फेडावे, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहेत.
नांदेड जिल्ह्यातही पावसाचे रौद्ररुप पहायला मिळतंय. अर्धापूर तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. याठिकाणी 24 तासांत 129 मिमी पावसाची नोंद झालीय. औरंगाबादच्या सोयगाव, सिल्लोड, फुलंब्रीमध्ये पावसाने नागरिकांचे हाल होत आहे. इकडे हिंगोलीच्या वसमत, औंढा, कळमनुरी, सेनगाव तालुक्यालाही पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे.
काही नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे. तर जालन्याच्या भोकरदनमधील केळणा नदीला पूर आलाय. औरंगाबाद- बुलडाणा, जाफ्राबाद-भोकरदन महामार्गावरील वाहतूक बंद आहे. सरकारकडून तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश दिल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.