रवींद्र कांबळे / सांगली : परतीच्या पावसानं शेतकरी हतबल झाला आहे. जवळजवळ अर्ध्या महाराष्ट्रातील काढणीला आलेली पिकं उद्ध्वस्त झाली आहेत. कांदा, सोयाबीन, भात, नाचणी, उसाला सर्वाधिक फटका बसला आहे. दरम्यान, सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळी ३६ फूट वाढली असून काका नगर, दत्तनगर, सूर्यवंशी प्लॉट, भीमनगरमधील अनेक घरांत पाणी घुसले आहे. त्यामुळे ३५० नागरिकांचं स्थलांतर करण्यात आले आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांगली जिल्ह्यातील ५५ पूल पाण्याखाली तर ९० मार्ग बंद आहेत. त्यामुळे दळवळणाच्या प्रश्न गंभीर झाला आहे. कृष्णा, माणगंगा, अग्रणी, येरळा, बोर आणि कोरडा या नद्यांना पूर आला आहे. नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तर तासगाव तालुक्यातील सावळज येथील पूल वाहून गेला आहे. सावळज - वायफळे मार्गावरील पूल वाहून गेल्याने वाहतूक बंद झाली आहे. अग्रणी नदीच्या पुराच्या पाण्याने हा वाहून गेला आहे. पुरामुळे या गावांचा संपर्क तुटला आहे.



सांगलीच्या जत तालूक्यातील भिवर्गी येथे बोर नदीस आलेल्या पूरात एक ट्रकटर ट्रॉली सहित बुडाला. यात एक ३२ वर्षीय तरुण वाहून गेला. भिवर्गीहून करजगी या गावास ट्रॅक्टरमधून धोकादायक पूलावरुन दुधाने भरलेले कॅन वाहतूक करीत असताना हा अपघात झाला. 


शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान


मुसळदार पावसामुळे सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं आहे. इथल्या शेतकऱ्यांना लाखो रुपयांचं नुकसान सहन करावं लागतंय. टाकळी इथल्या स्वराज्य पाटील या तरुणाची संपूर्ण शेती उध्वस्त झाली आहे. परतीच्या पावसानं राज्यभर धुमाकूळ घातला. सांगलीतील शेतकऱ्यांनाही याचा फटका बसलाय. सांगलीच्या टाकळी इथल्या तरुण शेतकऱ्याचीही हीच अवस्था झाली आहे. स्वराज्य पाटील या तरुण सुशिक्षित शेतकऱ्यानं आपल्या आठ एकर क्षेत्रात शेती करण्याचा निर्णय घेतला. 


स्वराज्यनं दोन एकरात द्राक्ष बाग, एका एकरात ऊस, तीन एकारात शाळू आणि अर्ध्या एकर क्षेत्रात कोथिंबिरीची लागवड केली. यासाठी त्याला साडे तीन ते चार लाखांचा खर्च आला. यंदा चांगलं उत्पन्न मिळेल अशी आशा बाळगणाऱ्या स्वराज्यचा परतीच्या पावसानं घात केला. छाटणी केलेली द्राक्ष बाग, काढणीला आलेली कोथिंबीर आणि शाळूचं पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. 


 सांगली जिल्ह्यातील पूर्व भागात कायम पाणी टंचाईची समस्या शेतकऱ्यांना भेडसावत असते. अशा परिस्थिती पाण्याचं योग्य व्यवस्थापन करुन मोठ्या प्रयत्नातून शेती केली जाते.  मात्र यंदा कोरोनाचं संकट त्यात परतीच्या पावसाचा फटका. त्यामुळे स्वराज्य आणि त्याच्यासारखे कैक शेतकरी आता रडकुंडीला आले आहेत.