सांगलीत जोरदार पावसामुळे कृष्णा, वारणा नदीच्या पाणी पातळीत
सांगली जिल्ह्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ.
सांगली : जिल्ह्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे पश्चिम भागातील कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. आटपाडी, कवठेमहांकाळ, जत या दुष्काळी तालुक्यातील नद्यांनाही पूर आलाय. दुष्काळी भागातील अनेक गावातील नाले, ओढे ओसंडून वाहू लागलेत. आटपाडी तालुक्यातील तलाव १४ वर्षांनंतर पहिल्यांदा भरलाय. पुरामुळे भात, ऊस, सोयाबीन, भुईमूग या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दरम्यान, पुण्यात आजही संध्याकाळी अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. दिवसभर पावसाने उघडीप दिली होती. मात्र संध्याकाळी ढग दाटून आले आणि पावसाला सुरुवात झाली. शहराच्या विविध भागात सुमारे अर्धा ते एक तास पाऊस कोसळला. या पावसामुळे नेहमीप्रमाणे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. काल रात्री पावसाने शहराला झोडपून काढले. पावसाचा जोर वाढल्यानंतर शहरातील मध्यवर्ती आणि उपनगरातील अनेक नागरी वसाहतीमधील घरांमध्ये पाणी शिरले होते. सप्टेंबरमध्ये पावसाने कहर केला होता. यात जीवितहानीबरोबर मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली होती. दरम्यान, मागील तीन दिवसांपासून पुण्यात संततधार पाऊस कोसळत आहे.