यवतमाळमध्ये वादळाच्या तडाख्यात १ ठार, १० जखमी
वादळाच्या गतीने मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली तर वीजेचे टॉवर, खांब आणि मोठी वृक्ष उन्मळून पडले.
यवतमाळ: बाभूळगाव तालुक्यात मंगळवारी रात्री वादळाचा जोरदार तडाखा बसला. आलेगाव आणि आसेगाव देवी गावात तर वादळाने कहर केला यात एक जण ठार दहा जण गंभीर जखमी झाले. शिवाय दोन बैल देखील ठार झाले. परिसरात अचानक सोसाट्याचा वादळ वारा सुरू झाला. वादळाच्या गतीने मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली तर वीजेचे टॉवर, खांब आणि मोठी वृक्ष उन्मळून पडले. यावेळी सुधीर राठोड हे आपल्या घरातील खाटेवर बसून असताना वादळात त्यांचे घर कोसळले. घराची भिंत सुधीर च्या अंगावर कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी यवतमाल च्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.