रायगड : सलग तीन दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकण हाऊसफुल्ल झालंय मात्र असं असलं तरी कोकणात येणा-या पर्यटकांना अभूतपूर्व वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय मात्र हे सगळी वाहतूक कोंडी होतंय तरी कशामुळे याचा शोध आम्ही घेतला आणि याला जबाबदारपण इथे येणारे काही अतिउत्साही पर्यटक असल्याचं समोर आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाहनांच्या लांबच लांब रांगा... सर्वसामान्यांसह पर्यटकांचे होणारे हाल... गेले तीन दिवस राज्यातल्या विविध महामार्गांवर हेच चित्र पाहायला मिळालं. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे असो वा मुंबई-गोवा महामार्ग.. प्रत्येक ठिकाणी वाहतूक कोंडीमुळे सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांचा हिरमोड झाला.


रायगडच्या पेण, रामवाडी, तरणखोप इथं वाहनांच्या रांगाच रांगा पाहायला मिळाल्या. त्यामुळं कोकणासह गोव्यात जाणा-या प्रवाशांनी रायगड वाहतूक पोलिसांच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली खरी मात्र याला जबाबदार होते ते म्हणजे अतिउत्साही पर्यटकच.


लेनची शिस्त न पाळणे यामुळे जरी वाहतूक कोंडी होत असेली तरी दुस-या बाजूला एकाच वेळी हजारोंच्या संख्येत वाहने रस्त्यावर आल्याने देखील वाहतूक कोंडी झाली हे देखील नाकारता येत नाहीय. मुंबई, पुण्यावरून खासगी वाहने तसेच प्रवासी बसेसने कोकणात पर्यटनासाठी निघाले होते. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर नेहमीपेक्षा अधिक वाहनांची संख्या होती.


कोलाडजवळ असलेला कुंडलिका आणि आणखी एका छोट्या नदीवरील अरुंद पुलावरून संथगतीने एकेरी वाहतूक सुरू होती. परिणामी दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाली होती. त्यात अवजड वाहनांमुळे इतर वाहने अडकून पडली होती. तर रत्नागिरीतल्या गुहागरमधील शहरातील अरूंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी झाली.


रत्नागिरी-गणपतीपुळे मार्गावरील शिरगाव इथं अरूंद रस्त्यामुळे व वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे वाहतूक कोंडीचा सामना पर्यटकांना अधिक करावा लागला.


दरवर्षीपेक्षा यंदा कोकणात येणा-या पर्यटकांची संख्या वाढली आहे हे नाकारता येत नाही. मात्र येणा-या पर्यटकांनी बेशिस्तपणे पार्किंग केली नाही, बेदरकारपणे कार चालवली नाही आणि लेनची शिस्त मोडली नाही तर या वाहतूक कोंडीतून सर्वसामान्यांची सुटका नक्कीच होऊ शकते.