प्रफुल्ल पवार, झी मीडिया, अलिबाग :  रायगड जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. माणगाव ते लोणेरे (Mangaon Lonere) दरम्यान वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. सलग सुट्यांवरून परतणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. या कोंडीमुळे प्रवाशांना नाहक मनस्तापाचा सामना करावा लागला आहे. (heavy traffic congestion on mumbai goa highway in raigad district queues of vehicles between mangaon to lonere)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंबेडकर जंयती,  गूड फ्रायडे शनिवार आणि रविवार अशा एकूण 4 सुट्ट्या जोडून आल्या. जोडून आलेल्या सुट्ट्यानंतर पर्यटकांची रायगड जिल्ह्याला पहिली पसंती असते. या निमित्ताने अनेक पर्यटक हे जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळी जातात. मात्र सुट्टी संपल्यानंतर अनेकांनी परतीचा मार्ग धरला. 



तर दुसऱ्या बाजूला परीक्षा संपल्यामुळे अनेकांनी गावचा रस्ता धरला. त्यामुळे महामार्गावर एकच वाहनांची संख्या वाढली. परिणामी वाहतूक कोंडी वाढली. माणगाव बाजारपेठ ते लोणेरे हायवे नाका इथपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.


महाड ते कोलाड या तासाभराच्या प्रवासाला अडीच तास लागत आहेत. काही ठिकाणी महामार्गाच्या रुंदीकरणाची कामे अर्धवट आहेत. प्रत्येकाला मुंबईत लवकर पोहोचण्याची घाई झाली आहे त्यामुळे वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत वाहने चालवली जात आहेत.


परिणामी ही वाहतूक कोंडी झाली असून वाहतूक पोलीस ही कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र ही कोंडी सोडवायला पोलिस बळ कमी पडत असल्याचे दिसून येते त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे.