Mumbai Goa Highway : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहन चालकांसाठी दिलासा दायक बातमी आहे.  मुंबई-गोवा महामार्गावर उद्यापासून म्हणजे 27 ऑगस्टपासून ते गणेशोत्सव संपेपर्यंत अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होणार आहे. 


अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग कोणता?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई-गोवा हायवेचं काम जलदगतीने पूर्ण होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. पळस्पे ते वाकण फाटा दरम्यान 16 टना पेक्षा अधिक वजनाच्या वाहनांना वाहतुकीस बंदी असेल. ही वाहने जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून खोपोली ते पाली मार्गे  वाकण फाटा इथं पर्यंत येतील तिथून पुढे कोकणात जातील. यातून अत्यावश्यक सेवा, दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, लिक्वीड ऑक्सीजन यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना वगळण्यात आले आहे.


मुंबई गोवा महामार्गमार्गाचं काम 12 वर्षे रखडलंय


मुंबई गोवा महामार्गमार्गाचं काम 12 वर्षे रखडलंय. गणेशोत्सवापूर्वी या रस्त्याच्या एका लेनचे काम पूर्ण व्हावे यासाठी शासनाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता सिबिटी तंत्रज्ञान वापरलं जातंय.


मुंबई-गोवा हायवेच्या एका लेनच काम गणेशोत्सवाच्या आधी पूर्ण होईल असे आश्वासन 


मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरच्या एका लेनच काम गणेशोत्सवाच्या आधी पूर्ण होईल अशी ग्वाही देण्यात आलीय. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ग्वाही दिलीय. तर डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्ण महामार्गाचं काम पूर्ण होईल अशी प्रतिक्रिया रवींद्र चव्हाण यांनी दिलीय.


मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून मनसे आक्रमक


मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून मनसेनं आक्रमक पवित्रा घेतलाय. अभी नही तो कभी नही असं म्हणत कंत्राटदार आणि प्रशासनाला धडा शिकवण्यासाठी मनसेनं ठिकठिकाणी खळ्ळंखट्याक आंदोलन सुरू केलंय. बुधवारी राज ठाकरेंनी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. चंद्रावर जाऊन खड्डे पाहण्यापेक्षा महाराष्ट्रातच खड्डे पाहा असा खोचक टोलाही त्यांनी लगावला होता. 


कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना टोल माफ


गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. यंदा गणपतीला कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची टोल माफी करण्यात येणारेय. मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीचा ताण कमी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतलाय. यामुळे कोकणात जाणाऱ्यांचे आता 600 ते 700 रुपये वाचणार आहेत. मात्र, यासाठी पास काढावा लागणारेय. मुंबई शहरासह ठाणे, पालघर इथल्या नागरिकांना जवळच्या पोलीस स्टेशन आणि आरटीओकडून पास घ्यावे लागणारेय.