ganesh visarjan 2023 :  गणेशोत्सवाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून विविध सेवा सुविधा गणेशभक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात येतात. या सुविधांमध्ये अद्ययावत व वापरास सुलभ अशा आणखी एका सुविधेची भर यंदा पडली आहे. मुंबईतील नागरिक आणि विशेषतः पर्यटक यांच्यासाठी नजीकचे गणपती मंडळ त्याचप्रमाणे गणेश भक्तांना देखील आपल्या नजीकचे मूर्ती विसर्जन स्थळ शोधण्याची सुविधा व्हॉट्स एप चॅटबॉट आणि महानगरपालिका संकेतस्थळ या दोन्ही माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी महानगरपालिका संकेतस्थळावरुन आपल्या पसंतीचे ठिकाण व वेळ देखील नोंदण्याची ऑनलाईन सुविधा पुरवण्यात आली आहे. 

 

मुंबईतला गणेशोत्सव हा मुंबईकर नागरिकांप्रमाणेच संपूर्ण महाराष्ट्रातून आणि देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी मोठी पर्वणी असते. गणेशोत्सवाचा आनंद घेणे नागरिकांना व पर्यटकांना अधिक सोपे व्हावे, यासाठी त्यांना आपल्या नजीकचे गणेश मंडळ शोधता यावे तसेच तेथपर्यंत पोहचणे सोपे व्हावे यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने व्हॉट्स एप चॅटबॉट आणि महानगरपालिकेचे संकेतस्थळ या दोन्ही ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञान आधारीत पर्याय उपलब्ध करून देण्याचे निर्देश प्रभारी आयुक्त तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांनी दिले होते. त्यानुसार, गणेश भक्तांना आता आपल्या नजीकचे व आवडीचे गणेश मंडळ, त्याचप्रमाणे भाविकांना विसर्जन स्थळांची माहिती मिळवणे, विसर्जनाचे ठिकाण व वेळ यांची ऑनलाईन नोंद करणे, इत्यादी सुविधा अत्यंत सुलभरित्या उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत, अशी माहिती उपआयुक्त (परिमंडळ २) तथा गणेशोत्सवाचे समन्वयक रमाकांत बिरादार आणि संचालक (माहिती तंत्रज्ञान) शरद उघडे यांनी दिली आहे.

 

मुंबईतील घरगुती आणि सार्वजनिक गणेशमूर्तींची संख्या प्रचंड असते. समवेत, श्री गणेशोत्सवात मुंबईत लाखोंच्या संख्येने पर्यटक येतात. तसेच मूर्ती विसर्जनासाठी देखील भाविकांची मोठी गर्दी होत असते. या सर्व घटकांच्या मदतीसाठी चॅटबॉट व संकेतस्थळ या दोन्ही ऑनलाईन सुविधा अतिशय मदतीच्या ठरणार आहेत. 

 

बीएमसी व्हॉट्स एप चॅटबॉटवर असे शोधा गणेश मंडळ आणि विसर्जन ठिकाण 


 

बृहन्मुंबई महानगरपालिकेची मायबीएमसी व्हॉटस् ऍप् चॅटबॉट (MyBMC WhatsApp Chatbot) ही भ्रमणध्वनी आधारित सेवा 8999-22-8999 या क्रमांकावर उपलब्ध आहे. त्याद्वारे नागरिकांना वेगवेगळ्या नागरी सेवा-सुविधां कशा प्राप्त कराव्यात, याचे मार्गदर्शन करण्यात येते. या चॅटबॉटमध्ये यंदा आपल्या नजीकचे गणेश मंडळ व मूर्ती विसर्जन स्थळ शोधण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यासाठी, या चॅटबॉट क्रमांकावर जाऊन पर्यटक (Tourist) हा पर्याय निवडावा. त्यानंतर मुख्य सूची (list) या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर, माझ्या जवळच्या सुविधा यामध्ये (amenities near me) क्लिक केल्यास गणपती मंडळ (Ganpati Mandal) तसेच गणपती विसर्जन (Ganpati Visarjan) असे दोन पर्याय दिसतात.

 

बृहन्मुंबई महानगरपालिका संकेतस्थळ


 

महानगरपालिकेचे संकेतस्थळ https://portal.mcgm.gov.in यावर देखील श्री गणेशोत्सवाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या ऑनलाईन सेवा गणेश भक्त, नागरिक व पर्यटकांनासाठी उपलब्ध आहेत.  महानगरपालिका संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावर नकाशे, अंतरंग व अहवाल (Maps, Reports & Insights) या टॅबवर क्लिक केल्यानंतर गणेशोत्सव स्टोरी मॅप २०२३ (Ganesh Festival Story Map 2023) या सदरामध्ये देखील आपल्या जवळील गणेश मंडळ, विसर्जन स्थळं तसेच इतरही माहिती जाणून घेता येणार आहे. विशेष म्हणजे, या स्टोरी मॅपच्या मदतीने आपल्या  स्थानावरून संबंधित गणेश मंडळाच्या स्थानापर्यंत पोहोचणे, मूर्ती विसर्जन स्थळापर्यंत जाण्याचे दिशानिर्देश (navigation), तेथपर्यंत पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची साधने (routing), रहदारीसाठी लागणारा वेळ इत्यादी माहिती देखील मिळणार आहे. विशेष म्हणजे, संबंधित विसर्जन स्थळ नैसर्गिक आहे की कृत्रिम यासह त्याची आवश्यक ती सर्व माहिती देखील यातून मिळते.

 

घरबसल्या नोंदणी करा आपल्या बाप्पाच्या मूर्ती विसर्जनाचे ठिकाण आणि वेळ


 

गणेशमूर्ती विसर्जनासाठी भाविकांना सुविधा व्हावी, विसर्जनस्थळी एकाच वेळी गर्दी होवू नये, यासाठी देखील बृहन्मुंबई महानगरपालिकेने https://portal.mcgm.gov.in या आपल्या संकेतस्थळावर मूर्ती विसर्जन वेळ नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुविधा विकसित केली आहे. गणेशोत्सव मंडळ अथवा भाविकांनी संकेतस्थळावर 'नागरिकांकरीता' या सदरामध्ये जावून 'श्री गणेश मूर्ती विसर्जनाचे स्लॉट बुकींग' हा पर्याय निवडावा. (महानगरपालिका  पोर्टल > नागरिकांकरीता> गणपती विसर्जनाची स्लॉट बुकींग) अथवा https://mumgis.mcgm.gov.in/Bappa_Visarjan/ या लिंकचा उपयोग करावा.  

अशा पद्धतीने मूर्ती विसर्जनाचे ठिकाण व वेळ नोंदणी केल्यास अधिक सोईचे ठरणार आहे. कारण त्यातून गर्दीचे व्यवस्थापन करणे मोलाचे ठरणार आहे. सबब, सर्व गणेश भक्त, नागरिक व पर्यटकांनी बीएमसी चॅटबॉट व बृहन्मुंबई महानगरपालिका संकेतस्थळांवरील या ऑनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.