कोल्हापुरातील विशाळगडावरील कुर्बानीला हायकोर्टाकडून परवानगी
विशाळगडाच्या आवारात 11 व्या शतकापासून हा दर्गा अस्तित्वात आहे. मुस्लिम भाविकांबरोबरच हिंदू भाविकही पिढ्यानपिढ्या तितक्याच भक्तीभावानं इथं येतात.
Bakra Eid 2024 : कोल्हापुरातील विशाळगडावरील कुर्बानीला हायकोर्टाकडून परवानगी देण्यात आली आहे. बकरी ईद आणि त्यापुढे चार दिवस चालणा-या ऊरूसा दरम्यान पशुबळी देण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे. 17 जून ते 21 जून दरम्यान विशाळगडावर हा उत्सव चालणार आहे. हजरत पीर मलिक रेहान मीर साहेब दर्गा ट्रस्टनं याबाबत हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
विशाळगडाच्या आवारात 11 व्या शतकापासून हा दर्गा अस्तित्वात आहे. मुस्लिम भाविकांबरोबरच हिंदू भाविकही पिढ्यानपिढ्या तितक्याच भक्तीभावानं इथं येतात. प्राचीन काळी कोंबड्या, मेंढ्या, बकऱ्यांचा बळी देऊन गरीबांना अन्नदान करण्याच्या हेतूनं सुरू झालेली प्रथा कालांतरानं धार्मिक प्रथा बनली आहे.
बकरी ईदच्या अनुषंगाने मुस्लिम समाजाने केलेल्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने आज सह्याद्री अतिथीगृहात विशेष बैठक पार पडली. या बैठकीत बकरी ईदचा सण दरवर्षीप्रमाणे साजरा केला जावा यासाठी त्याना अपेक्षित असलेले निर्णय घेण्यात आले. यात प्रामुख्याने देवनार कत्तलखान्यात सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच पार्किंग आणि स्वच्छतेबाबत अधिक दक्षता बाळगावी असे निर्देश दिले. तसेच या सणानिमित्त जनावरांची ने-आण करणाऱ्या वाहनांना कोणतीही आडकाठी करू नये असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांना दिले.
यावेळी आमदार अबू आझमी, आमदार अमीन पटेल, आमदार रइस शेख, शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम, शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे सईद खान तसेच मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव इकबालसिंह चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती आणि मुस्लिम संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.