हायस्पीड ट्रेनसाठी महाराष्ट्र-गुजरातचा समान खर्च, मग फायदा गुजरातलाच का?
माहितीच्या अधिकारात उघड झाली धक्कादायक माहिती
नाशिक : हायस्पीड ट्रेन नाशिकमार्गे गुजरातला नेण्याची राज्य सरकारची विनंती केंद्र सरकारने फेटाळल्याचं समोर आलंय. माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी ही माहिती अधिकारात समोर आणलीय. महाराष्ट्राच्या फायद्यासाठी नाशिकमार्गे बुलेट ट्रेन वळवण्याची राज्य सरकारने १३ जानेवारी २०१६ रोजी पंतप्रधानांना आणि तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना पत्र लिहून विनंती केली होती. मात्र, राज्य सरकारचे पत्र असूनही या पत्राला पंतप्रधान आणि रेल्वे मंत्र्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्याऐवजी रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी पत्राला उत्तर देऊन राज्य सरकारच्या या मागणीचा विचार करता येणार नाही, असे उत्तर दिल्याने खळबळ माजली आहे.
दोन्ही राज्यांचा समान खर्च पण...
मुंबई - अहमदाबाद हायस्पीड ट्रेनच्या मार्गात महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, विरार, बोईसर ही केवळ चार स्थानके, तर गुजरातमध्ये आठ स्थानके येत असून हायस्पीड ट्रेनसाठी गुजरात आणि महाराष्ट्र समान खर्च उचलत असतानाही त्याचा फायदा गुजरातला होत असल्याची टीका होत होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नाशिकमार्गे हायस्पीड ट्रेन वळवण्याची मागणी केली होती.