खानदेशात यावर्षी उन्हाचे चटके आणखी वाढले
उत्तर महाराष्ट्रात सातत्याने पारा वाढताना दिसतोय. उन्हाचा प्रचंड कडाका आहे.
योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : उत्तर महाराष्ट्रात सातत्याने पारा वाढताना दिसतोय. उन्हाचा प्रचंड कडाका आहे. हिवाळ्यात थंडीचा विक्रम आणि उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच चाळीसच्या पुढे तापमान. यामुळे नाशिककर हैराण झालेत.
उत्तर महाराष्ट्रात हवामानाची दोन टोकं सध्या अनुभवायला मिळत आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात थंडीनं टोक गाठलं. पारा 6.2 अंशांवर उतरला तर आता अवघ्या दीड महिन्याच्या कालावधीत म्हणजेच मार्चअखेरपर्यंत किमान पारा एकदम 37.3 अंशांवर पोहोचला.
मालेगाव, जळगाव या भागात पारा वाढला
किमान तापमान 15.3 अंशांवर तर कमाला तापमान 37.3 अंशांपर्यंत चढताना दिसतोय. या फरकामुळे आरोग्याच्या तक्रारी उद्भवत आहेत. गेल्या हंगामात उत्तर महाराष्ट्रात सर्वात कमी तापमान नाशिकच्या निफाड परिसरात नोंदवलं गेलं. मात्र आता मालेगाव, जळगाव या भागात पारा तापायला लागलाय. जळगावात पारा 39 अंशांवर पोहोचला. मार्चमध्येच हा पारा 39 अंशांवर पोहोचल्यामुळे एप्रिल आणि मेमध्ये काय स्थिती असेल याची काळजी नागरिकांना सतावत आहे.
पिकांनाही फटका बसू शकतो
रात्री गारवा आणि दिवसा उन्हाचे चटके यामुळे पिकांनाही फटका बसू शकतो. मात्र या परिस्थितीचा फायदा द्राक्षबागांना होणार आहे. सध्याच्या उष्णतेच्या लाटेमुळे होणाऱ्या बाष्पीभवनाचा परिणाम म्हणून तुरळक सरीही कोसळू शकतात. हा परिणामही लक्षात घेऊन काळजी घेणं गरजेचं आहे.
उष्णतेच्या लाटेमुळे ही परिस्थिती ओढवली आहे. कमाल आणि किमान तापमानातल्या फरकामुळे आरोग्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उन्हापासून स्वतःचं संरक्षण करणं गरजेचं आहे.