अभियंत्यांना मारहाण : नितेश राणेंना पोलीस कोठडी, नारायण राणे यांनी घेतली भेट
नारायण राणे यांनी आपले पूत्र नितेश राणे यांची भेट घेतली.
सिंधुदुर्ग : महामार्ग अभियंत्यांना मारहाण केल्याने दोडामार्ग येथे अटकेत असलेल्या आमदार नितेश राणे यांची पोलीस कोठडीत ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा सदस्य नारायण राणे यांनी भेट घेतली. नारायण राणे यांनी अचानक खास सिंधुदुर्ग दौरा केला आहे. त्यांनी नितेश यांच्याकडून सर्व प्रकरणाची माहिती घेतली या प्रकारानंतर राणे यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान, नारायण राणे यांनी आपल्या मुलाचे कृत्य चुकीचे होते, असे सांगत त्यांनी झाल्याप्रकरणी माफीही मागितली होती. त्यानंतर नितेश राणेंना अटक झाली. त्यांना ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याबाबत संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारही करण्यात आली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना जबाबदार धरण्यात आले. आमदार नितेश नारायण राणे आणि त्यांच्या समर्थकांनी कणकवली येथे मुंबई-गोवा महामार्गाजवळील पुलावर अभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखल फेकला. त्यानंतर त्यांना नदीवरील पुलावर बांधले.
कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे आणि स्वाभिमानीच्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना गडनदीवरील पुलावर रोखून धरले. सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाचा अनुभव उपअभियंत्यांनाही व्हावा यासाठी आमदार नितेश राणे यांनी चक्क चिखल अभियंत्याच्या अंगावर फेकला.