दीड टनाचा हिंदकेसरी रेडा! इंदापूर कृषी प्रदर्शनात गजेंद्रला पहायण्यासाठी तुफान गर्दी
इंदापुरात बाजार समितीच्या कृषी महोत्सवात आलेला दीड टनाचा गजेंद्र रेडा पाहण्यासाठी गर्दी होत आहे. सर्वत्र या रेड्याचीच चर्चा आहे.
जावेद मुलाणी, झी मिडीया, इंदापूर : दररोज १५ लिटर दूध ,तीन किलो सफरचंद ,चार किलो पेंड, तीन किलो गव्हाचे पीठ, मकवान कडबा ऊसाचे वाडे असा खुराक खाणाऱ्या तब्बल दीड टन वजनाचा हिंदकेसरी गजेंद्र रेडा इंदापूर कृषी प्रदर्शनामध्ये आकर्षण ठरला असून त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.
२४ जानेवारी ते २८ जानेवारी पर्यंत इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने कृषी महोत्सवात कृषी, जनावरे प्रदर्शन घोडेबाजार व डॉग शो आयोजित केला. कधी अवकाळी तर कधी दुष्काळी अतिवृष्टीचा संकट बळीराजाला सतावते आहे ,पण या अडचणीवरही कशी मात करता येऊ शकते हे सांगणार हे इंदापूरचं कृषी प्रदर्शन आहे. पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिकतेची जोडधरून जर शेतकऱ्यांनी काळी माती कसली तर नक्कीच भरघोस पीक घेता येईल. आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे हेच महत्व पटवून देण्यासाठी या कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा फायदा करून घ्यावा असे आवाहन बाजार समितीचे माजी सभापती जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी केले आहे.
या कृषी प्रदर्शनामध्ये शेती अवजारांबरोबरच पशुप्रदर्शन देखील भरवण्यात आले असून त्यामध्ये गजेंद्र रेड्याचे आकर्षण ठरत आहे. बेळगाव जिल्ह्यातील कागवाड तालुक्यातील मंगसुळी येथील विलास गणपती नाईक व त्यांचा मुलगा ज्ञानदेव नाईक यांनी हा रेडा इंदापूरच्या कृषी प्रदर्शनात आणला असून त्यांनी सांगितले की, याचे वय सहा वर्षे असून त्याला साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास करून या प्रदर्शनात आणले आहे. जवळपास ३० हजार रुपये भाडे गेले असून बीड, अहमदनगर, राहुरी व इतरत्र त्याला तिकिटावर पाहण्यासाठी आम्ही नेत असतो मात्र या ठिकाणी बाजार समितीने शेतकऱ्यांना पाहण्यासाठी मोफत ठेवले आहे. आठ वेळा गजेंद्रने हिंदकेसरी पुरस्कार मिळविला आहे
याच्या पासून म्हशी भरवण्यासाठी प्रत्येकी दोन हजार रुपये घेतले जातात यातून मोठी आर्थिक कमाई होत आहे. त्याला राहुरी व पंजाब येथील कंपन्यांनी ८० लाख ते जवळपास दीड कोटी रुपयांना विकत मागितले होते, मात्र आम्ही तो विकत नाही. गजेंद्रचा नावलौकिक झाला असून लोकांचे आकर्षण कायम ठेवण्यासाठी त्याचा सांभाळ करत असल्याचे ज्ञानदेव नाईक यांनी सांगितले.