हिंगणघाट : सर्वांचे लक्ष लागून असलेल्या हिंगणघाट जळीत प्रकरणात आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याची न्यायालयीन कोठडी आज संपत आहे. त्यामुळे त्याला हिंगणघाट न्यायालयात पुढील सुनावणीसाठी हजर करण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे सुरक्षेच्या दृष्टीने आरोपीची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देखील होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगणघाट जळीत प्रकरणात साक्षी पुरावे तपासल्यावर चार्जशीट दाखल करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंगणघाट येथील जळीतकांड प्रकरणाच्या पीडितेचा सोमवारी दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर सगळीकडे संतापाची लाट पाहावयास मिळाली. या घटनेतील आरोपीवर सुरवातीला हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल होता. पीडितेचा मृत्यू झाल्याने कलमात वाढ करत हत्येची कलम वाढवल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली. आधीच्याच नोंदविलेल्या गुन्ह्यात वाढ करण्यात आली आहे.



या घटनेतील आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळे हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणाचा तपास जलदगतीने सुरु असून प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची तयारी प्रशासनाकडून केली जात आहे.


एवढंच नव्हे तर आरोपीला कठोर शिक्षा व्हावी याकरिता सरकारकडून उज्वल निकम यांची नियुक्ती सुद्धा करण्यात आली आहे. पिडितेच्या दरोडा या गावात आज स्मशान शांतता पहावयास मिळाली. सोमवारी याच गावात अंत्यसंस्कारवेळी नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला होता. 


3 फेब्रुवारी रोजी प्राध्यापिका तरूणी कॉलेजला जात असताना हिंगणघाट चौकाजवळ ही घटना घडली. तरूणीवर पेट्रोल टाकून तिला जाळण्यात आलं. यामध्ये तरूणी 40 टक्के भाजली होती. मात्र चेहरा पूर्णपणे भाजला होता. उपचारादरम्यान या तरूणीचा 10 फेब्रुवारी रोजी पहाटे 6 वाजून 55 मिनिटांनी मृत्यू झाला. 


आरोपी विकेश नगराळे याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. नागपूरच्या कारागृहात विकेशची रवानगी करण्यात आली. येथे विकेशन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा होती. विकेशने ब्लॅंकेटच्या चिंधीने गळफास लावण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात होते. मात्र, जेल चे सुप्रीटेंडेंट आणि इतर अधिकारी मात्र ही कोरी अफवा असल्याचं सांगत आहेत.