गजानन देशमुख, झी 24 तास,हिंगोली : राज्यात बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयानं सशर्त परवानगी दिली आहे. या निर्णयामुळं राज्यातील बैलगाडा मालकांना दिलासा मिळाला. मागचे अनेक वर्षं बैलगाडा शर्यत बंदी होती तरी अनेकांनी आपल्या बैलांवर जीवापाड प्रेम केलं. आपल्या बैलांवर पोटच्या मुलासारखी माया करणा-या अशाच एका शेतक-याची कहाणी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बैलगाडा शर्यतीची तालीम करणारे हे आहेत हिंगोली पिंपळदरीचे अल्पभूधारक शेतकरी बबन भगत आहेत. बबन भगत यांनी एका यात्रेत बैलगाडा शर्यत पाहिली आणि तिथूनच सुरू झाला बैलगाडा शर्यतीचा ध्यास आहे. त्यांच्या हातोडा आणि प्रेम चोपडा या दोन बैलांनी पंचक्रोशीतली मैदानं गाजवली. 


150हून अधिक बैलगाडा शर्यत जिंकत या बैलजोडीनं बबन भगत यांना लाखोंची बक्षिसं मिळवून दिली. या बैलांना विकण्याचा विचारही कधीच त्यांच्या मनात आला नाही. मात्र शर्यतींवर बंदी आली आणि या बैलांच्या संगोपनाचा खर्च परवडेनासा झाला. 


आज ना उद्या शर्यतीवरील बंदी उठेल या भाबड्या आशेनं त्यांनी पोटाला चिमटा काढला. 32 बैलांसह 55 जनावरांचा सांभाळ केला. बैलांच्या संगोपनासाठी त्यांना आपला टेम्पोही विकावा लागला. 


बबन भगत यांच्याकडे 1 एकर शेती असून  55 जनावरं आहेत. त्यातील निम्यापेक्षा अधिक बैल शर्यतीचे असल्यानं त्यांना शेती कामात जुंपता येत नाही. बंदी उठल्यानं त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 


अवघ्या काही सेकंदात शर्यत पूर्ण करणारे सोन्या, डॉन, शहेनशहा, मन्या सारखे बैल त्यांच्याकडे आहेत. या बैलांनी त्यांना पैशांसोबत प्रतिष्ठा मिळवून दिलीय. आता राज्यात पुन्हा एकदा हुर्रर्र सुरू होणार असल्यानं त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्यांचे बैल पुन्हा मैदान गाजवतील, अशी खात्री त्यांना आहे.