गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली : गावागावांतल्या शाळांमधले गुरूजी पाहता पाहता मास्तर झाले.... आणि अगदी काही ठिकाणी मास्तरडेही झाले..... पण महाराष्ट्रातल्या एका गावात सध्या एक आंदोलन पेटलंय.... इथल्या गावातल्या मास्तरांची बदली झाली, म्हणून इथल्या ग्रामस्थांनी अन्नपाण्याचा त्याग केलाय...... इतकंच नाही, तर एकाला मास्तरांची बदली झाली, हे ऐकून हृदयविकाराचा झटकाही आलाय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुणी आंदोलन करतंय.... तर कुणी आपापले व्यवसायच बंद ठेवलेत, कुणी चूल बंद ठेवलीय, तर कुणी थेट रुग्णालयातच दाखल झालंय.... बायाबापड्यांच्या डोळ्यांतलं पाणी तर थांबतच नाहीय. सध्या हे सगळं सुरू आहे हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातल्या गढाळा गावात...... आणि हे कशासाठी सुरू आहे याचं कारण मोठं आश्चर्यकारक आहे...... हे सगळं सुरू आहे एका मास्तरांची गावातून झालेली बदली थांबवण्यासाठी....... 


ऊसतोड कामगारांचं हे गाव..... शिक्षणाचा फारसा गंध नव्हताच... बहुतांश घरातला कष्टाचा पैसा दारुच्या अड्ड्यावर, मटक्यांवर खर्च व्हायचा....  बायकांना मारझोड आणि भांडणं नेहमीचीच...  पण या गावात बारा वर्षांपूर्वी एका मास्तरांची बदली झाली..... उत्तम वानखेडे त्यांचं नाव....... गुरूजींनी शाळेत उपस्थिती वाढवली, शाळा डिजिटल केली,पोटच्या पोराप्रमाणं  शाळेतल्या पोरांना शिकवलं. पदरमोड करत मुलांना शैक्षणिक साहित्य घेऊन दिलं. विद्यार्थ्यांना पुढच्या शिक्षणासाठी पुण्याच्या शाळेत पाठवलं. गुरूजींमुळे गावातल्या अनेकांची व्यसनं सुटली.... गुरूजींनी शाळेबरोबर अनेक माणसंही उभी केली.....


या गुरुजींची बदलीची ऑर्डर आली... तेव्हापासून गाव पुरतं कोसळून गेलंय.... ही बातमी ऐकताच ग्रामस्थ ज्ञानदेव असोले यांना हृदयविकाराचा झटका आलाय... बदली रद्द केली नाही तर सामूहिक आत्मदहनाचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. 


एखाद्या शिक्षकाची गावातून बदली झालीच, तर हल्ली फुल ना फुलाच्या पाकळीपुरते फक्त उपचाराचे निरोप समारंभ होतात... नात्यांचे सगळेच बंध सैलसर पडण्याचा हा काळ.... त्याचवेळी एका मास्तरांची बदली थांबवण्यासाठी अख्खं गाव आंदोलन करतं.... क्या बात है..... मास्तर मानलं तुम्हाला.....