हिंगोली : जिल्ह्यात वारंवार भूगर्भातून गूढ आवाज येऊन जमीन हादरू लागली आहे. बुधवारी दुपारी १२ वाजून ५  मिनिट आणि २३ सेकदांना हिंगोली जिल्ह्यातील १७ गावांना भूकंपाचा सौम्य धक्का बसलाय. लातूर इथल्या भूकंप मापक वेधशाळेने या भूकंपाची तीव्रता ३.० रिश्टर स्केल येवढी असल्याचं सांगितलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत जाणवलेल्या धक्क्यांपैकी हा सर्वात मोठा धक्का आहे. या मोठ्या आवाजामुळे जमीन हादरली असून औंढा नागनाथ तालुक्यातील सोनवाडी इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या भिंतींना तडे गेल्याने विद्यार्थ्यांची शाळा मोकळ्या मैदानात भरवण्यात आली. 


वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे हे गाव भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचं बोललं जातं आहे. या गावाला आतापर्यंत ४ वेळेस सौम्य धक्के जाणवले होते. वारंवार बसणाऱ्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 


तहसिलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी गावांना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.