गजानन देशमुख, हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात गलेलठ्ठ पगार असलेला लाचखोर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात सापडलाय. 3 लाख रुपयांची लाचेची मागणी केल्याप्रकरणी हिंगोलीचा तहसीलदार पांडुरंग माचेवाड याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. पकडलेले रेतीचे टीप्पर सोडून देण्यासाठी आणि अगोदर पकडण्यात आलेल्या टीप्परवर कारवाई न करण्यासाठी 3 लाख रुपयांची लाच हिंगोलीच्या या तहसीलदारांने मागितली होती. या कारवाईने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाळू वाहतूक करण्यासाठी वापरलेले टिप्पर पकडलेल्या तक्रारदाराने 25 मे रोजी तक्रार दिली होती. त्यांनी भाड्याने घेतलेले पाच टिप्पर मागील 20 ते 25 दिवसापूर्वी रेतीची वाहतूक करीत असतांना हिंगोली पोलिसांनी पकडले, सदर टिप्पर पोलीस स्टेशनला लावुन हिंगोलीचे तहसीलदार यांच्याकडे कार्यवाहीसाठी सुपूर्द करण्यात आले होते. 


तक्रारदार हिंगोलीचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांना भेटले असता रेतीच्या पकडलेल्या सगळ्या टिप्परची लवकर सुटका करायची असेल तर मागील महिन्याचे रेतीच्या टिप्परवर कार्यवाही न करण्यासाठी राहिलेले पैसे आणि पकडलेले 5 टिप्पर मिळून 3 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात देण्यात आली होती. 


तक्रारदार यांच्या तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता तहसीलदार माचेवाड यंमी तक्रारदार यांच्याकडे तीन लाख रुपयांची लाच स्विकारण्याची सहमती दिली. यावरून लोकसेवक तहसीलदार हिंगोली यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन हिंगोली शहर कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या पगारीचा मोठा अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अलगद सापडल्याने प्रशासनात एकच खळबळ माजली आहे...