अरुण मेहेत्रे, पुणे : सातारचे छत्रपती उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज...ही दोन्ही घराणी एकत्र आल्याचं चित्र कधी पाहायला मिळत नाही.. मात्र पुण्यातील सिंध सोसायटीत बंगला नंबर 471 मध्ये दोन्ही राजांच्या ऐतिहासिक भेटीचा योग जुळून आला... मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी दोन्ही राजे एकत्र आले... दोघांचेही कॉमन फ्रेंड असलेल्या संदीप पटेल यांच्या बंगल्यात दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठा समाजासाठी दोन्ही घराणी एकत्र आल्याचं संभाजीराजेंनी यावेळी सांगितलं. तर उदयनराजेंनी यावेळी आपल्या खास स्टाईलमध्ये जोरदार बॅटिंग केली. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर लोकशाहीतल्या 'राजां'ना जाब विचारला पाहिजे, असं उदयराजेंनी बजावलं.


छत्रपतींच्या या दोन वंशजांची भेट ख-या अर्थानं ऐतिहासिक मानली जातेय...


- याआधी 1731 मध्ये कोल्हापूर आणि सातारच्या घराण्यांमध्ये वारणेचा तह झाला होता.
- सातारचे शाहू महाराज आणि कोल्हापूरचे संभाजीराजे यांच्यातलं वितुष्ट वारणेच्या तहानं संपुष्टात आलं.
- आता तीनशे वर्षांनी पुन्हा एकदा दोन्ही छत्रपती घराण्यांचे वारसदार एकत्र आलेत...


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या 16 जूनपासून संभाजीराजेंनी कोल्हापुरातून आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिलाय. उदयनराजेंच्या पाठिंब्यामुळं या आंदोलनाला दहा हत्तींचं बळ आलंय...आता दोन्ही राजे एकत्र आल्यानंतर मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार का याबाबत जनतेच्या मनात उत्सुकता आहे.