सातारा: गड-किल्ले महाराष्ट्रातील जपायला हवेत अशी एका बाजूनं ओरड सुरू असतानाच ऐतिहासिक राजवाड्यांकडे दुर्लक्ष होतं आहे का असा प्रश्न पडत आहे. मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष सांगणारा साता-याचा ऐतिहासिक राजवाडा. 1844 साली बांधण्यात आलेला हा राजवाडा राज्या शासनाच्या ताब्यात आहे. मात्र दुर्लक्षामुळं या राजवाड्याची पार रया गेली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकेकाळचा हा दिमाखदार राजवाडा अशी त्याची ओळख होती. इतिहासाच्या खाणाखुणा अंगाखांद्यावर जपणाऱ्या राजवाड्याची आज दुरावस्था झाली आहे. 1844 मध्ये उभारण्यात आलेला हा राजवाडा 1876 मध्ये ब्रिटिशांनी स्वतःच्या ताब्यात घेतला. स्वातंत्र्यानंतर या राजवाड्यात शासकीय कार्यालयं आणि जिल्हा न्यायालय सुरू होतं. मात्र सरकारी कार्यालयं नव्या इमारतीत गेली आणि सरकारचं या वास्तूकडं पूर्णपणे दुर्लक्ष झालं. 


राजवाड्यातील लाकडी खांब, जुन्या वस्तू चोरीला गेल्या आहेत. अनेक भागांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. सागवानी कोरीव काम असलेले खांब कोसळलेत. अनेक खोल्यांचं छत कोसळलं. घुशी आणि इतर प्राण्यांच्या वावरामुळं दुर्मीळ शिल्पचित्रं, नक्षीकाम असलेल्या वस्तू नष्ट होत चालल्यात. या सगळ्या दुरावस्थेबद्दल इतिहासप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


सरकारला हा ऐतिहासिक ठेवा जतन करता येत नसेल तर तो आमच्या ताब्यात द्या, अशी भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली आहे. दरम्यान, हा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी राज्य सरकारचं नियोजन सुरू असल्याची माहिती साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. 


गेल्या 20 वर्षांपासून सरकारचं या वास्तूकडं दुर्लक्ष झालं आहे. साताऱ्याचं वैभव असलेला हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी सरकारनं लक्ष देण्याची गरज आहे.