नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे : सिटी चर्च... पुण्यातलं सर्वात जुनं चर्च... येत्या ८ डिसेंबरला हे चर्च २२५ वर्ष पूर्ण करत आहे. पण हे काही या चर्चचं एकमेव वैशिष्ट्य नाही. या चर्चचं खरं वैशिष्ट्य वेगळंच आहे. पेशवे, हे या चर्चचं वेगळेपण आहे. पेशव्यांनी या चर्चसाठी जागा दिली होती... आणि उभारणीसाठी आर्थिक मदतही...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातल्या क्वार्टर गेट परिसरातील सिटी चर्चचा हा घंटा नाद... मागील २२५ वर्षे हा घंटानाद अखंड सुरु आहे. पेशवाईत म्हणजे, १७९२ मध्ये हे चर्च उभारलं गेलं. त्यासाठी जागा दिली ती,  माधवराव पेशव्यांनी. त्यानंतर पेशव्यांचे कारभारी नाना फडणवीसांनी चर्चच्या बांधकामासाठी आर्थिक मदत देखील केली. पेशव्यांच्या सैन्यात पोर्तुगीज सैनिक होते. त्यांनी चर्च बांधण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर पेशव्याच्या भरीव मदतीमधूनच हे चर्च उभं राहिलं.


त्या काळात हे चर्च होतं पुणे शहराच्या एका प्रवेशद्वारावर, म्हणजे क्वार्टर गेटला... शहराच्या प्रवेशद्वारावर असल्यानं त्याला नाव पडलं सिटी चर्च... मागील २२५ वर्षात चर्चच्या इमारतीचा टप्प्या टप्य्याने विस्तार होत गेला. तसंच, चर्चचं कार्यदेखील विस्तारात गेलं. आज चर्चच्या आवारातच तीन शाळा आहेत. त्यात तीन हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पुण्याच्या उपनगरातही फक्त मुलींची एक शाळा आहे. त्या व्यतिरिक्त अनाथ मुलं, परित्यक्त्या स्त्रिया आणि वृद्धांचा सांभाळ चर्च करतं.


स्थापनेचं २२५वं वर्ष साजरं करण्याची जोरदार तयारी चर्चने केली आहे. त्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय. परिसरात आकर्षक मिरवणूक देखील काढली जाणार आहे. पण, या सर्व कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे असणार आहेत पेशव्यांचे वंशज.. सर्वधर्म समभाव ही मराठी साम्राज्याचा महत्त्वाची शिकवण खुद्द शिवरायांनी घालून दिलेली... छत्रपतींचं हे साम्राज्य राखताना पेशव्यांनीही ती समर्थपणे पाळली त्याचंच हे उत्तम उदाहरण...