उष्णतेचा भाजीपाल्यांवर परिणाम, भाजीपाल्याचे दर कडाडले
सणासुदीला भाव आणखी कडाडण्याची भीती
मुंबई : राज्यात उष्णता वाढल्याने भाजीपाल्यावर परिणाम झाला आहे. आज नवी मुंबईच्या घाऊक भाजीपाला बाजारात भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. उत्पादनात घट झाल्याने एपीएमसीमध्ये येणारी आवक कमी झाली आहे. त्यामुळे भेंडी, गवार, फरस बी, वांगी, या भाज्या महागल्या आहेत.
दर ३५ ते ४० टक्क्यांनी वाढले
नवरात्र असल्याने भाज्यांची मागणीही वाढली आहे. त्यामुळे दर ३५ ते ४० टक्क्यांनी वाढले आहेत. दरम्यान आज भाजपाल्याच्या तब्बल १०० गाड्या कमी आल्यानं सणासुदीला भाव आणखी कडाडण्याची भीती व्य व्यक्त होते आहे. .
ऑक्टोबर हिटचा परिणाम
दुसरीकडे राज्यात परतीच्या पावसाने ओढ घेतली आहे. त्यामुळे याचा परिणाम शेतमालांवर होऊ लागला आहे. ऑक्टोबर हिटमुळे भाज्यांचे दर वाढणार आहेत. अशीच स्थिती राहिली तर भाज्यांचे दर दुप्पट होण्याची भीती आहे. मुंबई आणि उपनगरात दररोज हजारो टन भाजीपाल्यांचा पुरवठा होतो. महाराष्ट्रात पावसाची स्थितीही नाजूक आहे. काही ठिकाणी परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने भाजीपाल्यावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. उष्णतेमुळे भाज्या लवकर खराब होत आहेत.