मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात चांगला पाऊस कोसळत होता. सोमवारी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आज सकाळपासून पावसाचा पुन्हा जोर रत्नागिरी जिल्ह्यात दिसून येत आहे. रविवारी चिपळूण बाजार पेठेतील शिवनदीनच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडल्याने चिपळूण बाजारपेठेत पाणी शिरले होते. आज पुन्हा जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, संगमेश्वर येथे मुंबई - गोवा महामार्गावार झाड कोसळून महामार्ग ठप्प झाला. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये सुरु असलेल्या अत्यावश्यक सेवेला याचा फटका बसला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळत आहे. शनिवारी आणि रविवारी चांगला पाऊस झाला होता.  पुन्हा मंगळवारी पावसाचा जोर वाढलेला दिसून येत आहे. जिल्ह्यात अनेक नद्यांना पूरस्थिती आल्याचे चित्र दिसून येत आहे. काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याची परिस्थिती आहे. १ जूनपासून जिल्ह्यात सरासरी ८५१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.



गुहागर, संगमेश्वर, चिपळूण, लांजा, राजापूर , दापोली या तालुक्यात पावसाचा जोर दिसून येत आहे. जोराचे वारे वाहत असून पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. दरम्यान, संगमेश्वर येथे फणसाचे झाड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली. हे झाड विद्युत तारांवर पडल्याने विद्युप पुरवठा खंडीत झाला आहे. तर हे झाड पडून एका रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. हे झाड रस्त्यावर बाजुला हटविण्याचे काम सुरु होते. जवळपास दोन तास वाहतूक ठप्प होती.