Heavy Rain In Maharashtra : महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस पडत आहे. कोकणात पावासाने धुमशान घातले आहे. मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग आणी रत्नागिरी जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. यापार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग आणी रत्नागिरी जिल्ह्यातील  शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ही घोषणा केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबतचे परिपत्रक तातडीने जारी करण्याचे आदेश  दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग आणी रत्नागिरी जिल्ह्याच्या कलेक्टरना दिले आहेत.  अतिवृष्टी च्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग आणी रत्नागिरी जिल्ह्यातील  शाळांना सुट्टी जाहीर करण्याची घोषणा करण्यात आली आहे. 


27 गावांचा संपर्क तुटला


सिंधुदुर्गात सकाळपासून धुव्वांधार पाऊस कोसळत आहे. कुडाळ, सावंतवाडी तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला आहे. कुडाळ माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला मोठा पूर आला असून, पुरामुळे आंबेरी पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे पुढील 27 गावांचा संपर्क तुटला आहे. तर, दुसरीकडे सिंधुदुर्ग मुंबई गोवा महामार्गावर कसालमध्ये डोंगर खचल्याने संपूर्ण चिखल रस्त्यावर आला आहे. त्यामुळे चिखलातून वाहन चालकांना प्रवास करावा लागतोय... तसंच महामार्गावर पाणी आल्यानं रस्त्याला नदीचं स्वरूप आल आहे. 


वर्षा सहलीसाठी गेलेल्या 130 पर्यटकांची सुखरुप सुटका


शहापूर तालुक्यातील भातसईमध्ये अडकलेल्या तब्बल 130 पर्यटकांची सुखरुप सुटका करण्यात आली. मुंबईहून वर्षा सहलीसाठी 130 पर्यटक, भातसईमधील सृष्टी फार्म हाऊस आले होते. मात्र या भागात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे शहापूर तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली. तर पाण्याची पातळी वाढल्यानं सर्व पर्यटक फार्म हाऊसमध्ये अडकून पडले. त्यांना बाहेर काढण्यासाठी NDRFकडून सुमारे 2 तास रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं आणि त्यांची सुखरुप सुटका केली गेली. 


कोकणाला जोरदार पावसानं झोडपलं. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर नदीचं पाणी आलं आणि इथली वाहतूक ठप्प झाली. ओरोस ते कुडाळ दरम्यानची ही घटना आहे. यामुळे प्रवाशांचा पुरता खोळंबा झाला. मुंबई-गोवा महामार्ग कित्येक वर्षांपासून प्रवाशांकरता डोकेदुखी ठरतोय. त्यातच आता या घटनेची भर पडली.