उन्मेष पाटील यांची मारहाण प्रकरणी चौकशी होणार, गृहमंत्र्यांची घोषणा
तत्कालीन भाजप आमदार आणि विद्यमान भाजप खासदार उन्मेष पाटील यांची माजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी चौकशी होणार आहे.
मुंबई : तत्कालीन भाजप आमदार आणि विद्यमान भाजप खासदार उन्मेष पाटील यांची माजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी चौकशी होणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याची आज घोषणा केली. सोनू महाजन यांनी आज कुटुंबासह गृहमंत्र्यांची मुंबईत भेट घेतली. उन्मेष पाटील यांना भाजप सरकारने वारंवार पाठिशी घातल्याचा आरोप सोनू महाजन यांनी केला आहे.
उन्मेष पाटील यांनी माजी सैनिकाला केलेल्या मारहाण प्रकरणाच्या चौकशी करण्याची घोषणा केली आहे. २०१६ साली भाजपचे तत्कालिन आमदार असलेल्या उन्मेष पाटील यांनी माजी सैनिक सोनू महाजन यांच्यावर हल्ला केला होता. मात्र त्याप्रकरणी तत्कालिन भाजप सरकारने कोणतीही कायदेशीर कारवाई केलेली नाही. याप्रकरणी निवदेन आल्याने त्यांच्या चौकशीचे आदेश गृहमंत्रालयाने दिले आहेत.
भाजपचे सरकार असल्याने साधा एफआयआर देखील दाखल झाला नाही. २०१९ मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. परंतु पुढे कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नाही. तेव्हाच्या भाजप सरकारने महाजन यांना न्याय दिला नाही. याबाबत आलेल्या निवेदनांनुसार आता पोलिसांना चौकशीचे आदेश देण्यात आलेत, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.