कोरेगाव भीमा हिंसाप्रकरणात पुणे पोलिसांच्या तपासावर गृहमंत्र्यांची नाराजी
कोरेगाव भीमाप्रकरणी केलेल्या तपासावर नाराजी
मुंबई : कोरेगाव भीमाप्रकरणी केलेल्या तपासाबाबत गृह खात्यानं पुणे पोलिसांवर तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतलेल्या बैठकीत पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल आणि इतर अधिकाऱ्यांची उलट तपासणी केली. तब्बल अडीच तास चाललेल्या या बैठकीत अर्धा तास पोलीस महासंचालक आणि पुण्याच्या सह पोलीस आयुक्तांनी कोरेगाव भीमाप्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर तब्बल पावणे दोन तास चाललेल्या बैठकीत गृहमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना अनेक प्रश्न विचारले.
पुणे पोलिसांनी जवळपास सर्व प्रश्नांची उत्तरं दिली असली तरी काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागवण्यात आलं आहे. त्यामुळे कागदपत्रे सादर करण्यासाठी पुणे पोलिसांनी वेळ मागितली आहे. यावेळी गृहमंत्र्यांनी पुणे पोलिसांच्या तपासाबाबत नाराजी व्यक्त केली.
कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी हिंसाचार झाला होता. यानतंर राज्यभरात दुसऱ्या दिवशी याचे पडसाद उमटले. दरवर्षी हजारो अनुयायी या ठिकाणी १ जानेवारीला येत असतात.